आधीच प्रेक्षक कमी, कोरोनाने पुरती वाट लावली, गिरगावातील ‘अलंकार थिएटर’लाही टाळं!

| Updated on: Nov 29, 2021 | 1:26 PM

मुंबईतील अनेक सिंगल स्क्रीन आणि जुने थिएटर आता बंद पडत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. मागील जवळपास 10 वर्षांत मुंबईतील ‘नाझ’, ‘अप्सरा’, ‘गंगा-जमुना’, ‘ड्रिमलँड’ यासारखे सिंगल स्क्रीन थिएटर आता कुलूपबंद झाले आहेत. आता याच यादीत आणखी एक नाव सामील झाले आहे.

आधीच प्रेक्षक कमी, कोरोनाने पुरती वाट लावली, गिरगावातील ‘अलंकार थिएटर’लाही टाळं!
Theater
Follow us on

मुंबई : मुंबईतील अनेक सिंगल स्क्रीन आणि जुने थिएटर आता बंद पडत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. मागील जवळपास 10 वर्षांत मुंबईतील ‘नाझ’, ‘अप्सरा’, ‘गंगा-जमुना’, ‘ड्रिमलँड’ यासारखे सिंगल स्क्रीन थिएटर आता कुलूपबंद झाले आहेत. आता याच यादीत आणखी एक नाव सामील झाले आहे. गिरणगावातील अर्थात गिरगावमधील प्रसिद्ध अलंकार थिएटरवर देखील आता कायमस्वरूपी टाळे लागले आहे. ‘अलंकार’ बंद होत असल्याचे काळातच आता रसिक प्रेक्षकांमध्ये नाराजी देखील दिसून येत आहे.

‘अलंकार’ हे मुंबईतील अतिशय प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित असे चित्रपटगृह होते. याआधी ‘अलंकार’च्या जागी ‘कमल’ नावाचे चित्रपटगृह होते. मात्र, त्यानंतर 1960मध्ये तेथे ‘अलंकार’ हे सुसज्ज चित्रपटगृह उभे राहिले. या चित्रपटगृहाचा अनेक चित्रपटांच्या यशात मोलाचा वाटा आहे.

अनेक चित्रपटांच्या यशाचा साक्षीदार

मोनी भट्टाचार्य आणि बिमल रॉय यांचा ‘उसने कहा था’ हा हिंदी चित्रपट पहिल्यांदा तेथे प्रदर्शित झाला. सुनील दत्त आणि नंदा यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर अनेक हिंदी चित्रपट येथे प्रदर्शित झाले. या चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांनी तुफान यश मिळविले आहे. अनेक हिंदी चित्रपटांच्या यशाचे साक्षीदार असलेले हे थिएटर आता कायमचे बंद करण्यात आले आहे. या चित्रपटगृहाच्या देखभालीचा खर्च आणि एकूणच अन्य खर्च परवडत नसल्यामुळे ते बंद करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे.

आता खर्च परवडत नाही!

‘अलंकार’ चित्रपटगृहाचे मालक विजय शंभुलाल जोबनपुत्र यांनी एका वृत्तपत्राला याबाबत माहिती देताना म्हटले की, आता पूर्वीसारखे फारसे प्रेक्षक इथे चित्रपट पाहायला येत नाहीत. त्यातच देखभाल आणि अन्य खर्च देखील दिवसेंदिवस वाढत आहे. हा सगळा खर्च आता आमच्या खिशाला परवडत नाही.

…म्हणून सिंगल स्क्रीनला उतरती कळा!

त्यातच कोरोनामुळे जवळपास गेली दोन वर्षे चित्रपटगृह बंद ठेवलेले आहे आणि आता ते पुन्हा सुरु करणे शक्य वाटत नाही. ‘अलंकार’ बंद झाल्यानंतर त्या जागेवर पुढे काय करायचे ते अद्याप ठरलेले नाही. ‘सिनेमा ओनर्स अॅण्ड एक्झीबीटर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष नितीन दातार यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांच्या काही मागण्या आहेत. सरकारने आमच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन अद्यापही पाळले गेले नसल्यामुळे सिंगल स्क्रीन कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

हेही वाचा :

Bengaluru : पोलिसांची मुन्नवर फारुकीच्या स्टँडअप शोला परवानगी नाही, परवानगी नाकारल्यानंतर फारुकी म्हणाला…

हा ट्रॅप आहे यात अडकू नका… प्रख्यात अभिनेत्री शुभांगी गोखलेंसोबत नेमकं काय घडलं?

Priyanka chopra : matrix resurrections च्या नव्या व्हिडिओत प्रियंकाच्या अदांवर चाहते फिदा, हा हटके अंदाज पाहा