Maidaan Review : असा अभिनय पहिल्यांदाच बघाल; अजय देवगनचा ‘मैदान’ कसा?

| Updated on: Apr 09, 2024 | 5:34 PM

अजय देवगनचा मैदान हा सिनेमा 11 एप्रिल रोजी रिलीज होत आहे. अजय देवगनने आतापर्यंत जे जे सिनेमे केले, त्यातील हा सिनेमा अत्यंत वेगळा आहे. अजय देवगनला अभिनय क्षमता दाखवून देणारा हा सिनेमा आहे. तर प्रेक्षकांनाही हा सिनेमा पाहिल्यावर अजय देवगन किती मोठ्या उंचीचा आहे, हे दिसून येतं. वेगळा विषय असलेला हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊनच पाहिला पाहिजे.

Maidaan Review : असा अभिनय पहिल्यांदाच बघाल; अजय देवगनचा मैदान कसा?
Maidaan Review
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अजय देवगनचा ‘मैदान’ हा सिनेमा अखेर प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. गेल्या पाच वर्षापासून हा सिनेमा रखडला होता. कधी कोव्हिडमुळं, कधी वादामुळे तर कधी अन्य कारणाने मैदानच्या प्रदर्शनात खोडा येत होता. मधल्या काळात निर्माते हा सिनेमा प्रदर्शित करूही शकले असते. पण त्यांना आपल्या कंटेटवर भरवसा होता. चुकीच्यावेळी सिनेमा प्रदर्शित करून चांगला कंटेट बरबाद करू नये ही त्यामागची निर्मात्यांची भूमिका होती. मात्र, आता ‘मैदान’साठी मैदान पूर्णपणे मोकळं आहे, असं नाही. तर ‘मैदान’च्या समोर ‘बडे मियां, छोटे मियां’ हा सिनेमाही असणार आहे. मात्र, अजय देवगनचा बहुचर्चित ‘मैदान’ कसा आहे? याचं केलेलं हे परीक्षण.

भारतीय फुटबॉलचे सर्वात मोठे कोच अब्दुल रहीम यांची ही कथा आहे. अब्दुल रहीम यांनी भारतीयांना बूट घालून फुटबॉल खेळायला शिकवलं होतं. अनवाणी पावलाने फुलबॉल खेळणाऱ्या देशाला त्यांनी ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पोहोचवलं होतं. या सिनेमात त्यांच्या आयुष्यातील दहा वर्षाचा आढावा घेण्यात आला आहे. गेल्या 64 वर्षात त्यांच्यावर काहीच लिहिलं गेलं नाही. दाखवलं गेलं नाही. पण या सिनेमातून एका जिद्दी आणि ध्येयवेड्या कोचची कहाणी साकारण्यात आली आहे. 1952 ते 1962 हा भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ मानला जातो. या सिनेमात हा सुवर्णकाळ चित्तारला गेलाय. ही एस ए रहीम आणि भारतीय स्वाभिमानाची गौरव गाथा आहे. एका व्यक्तीने देशातील विविध ठिकाणच्या आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना कशी ट्रेनिंग दिली आणि त्यांना थेट आंतरराष्ट्रीय सामन्यात उतरवलं, याची ही कहाणी आहे.

अरे हे तर माहीत आहे…

मैदान सिनेमा पाहताना पदोपदी एक गोष्ट जाणवते. ती म्हणजे अरे हे तर मला माहीत आहे. हे तर मी अनेक सिनेमात पाहिलंय. माझ्या आजूबाजूला घडताना पाहिलंय. पण नंतर पुढच्या क्षणी लगेच कळतं की अशा प्रकारे नाही पाहिलं. थोडक्यात सांगायचं म्हणजे जुन्या कथेला नव्या फ्लेवरमध्ये टाकलं गेलंय. मैदानच्या कथेच तुम्हाला थक्क करणारे एलिमेंट्स दिसणार नाहीत. एका टप्प्यावर ही कथा प्रेडिक्टेबल होते. सांगायचंच झालं तर रहीम यांना आशियाई गेम्समध्ये कोच बनण्यासाठी सर्वात आधी व्होट कोण करेल? अर्थमंत्री या ठिकाणी काय निर्णय घेतील? किंवा अमूक एका मॅचमध्ये काय होईल? असे अनेक दृश्य आहेत की पुढे काय होईल हे आपण सहज सांगू शकतो. पण ते सीन वेगळ्या पद्धतीने कसे दाखवले हे त्यातील गिमिक्स आहे. म्हणूनच हा सिनेमा प्रेडिक्टेबल असला तरी खिळवून ठेवतो.

क्लायमॅक्समध्ये उड्याच माराल

सिनेमात पुढे काय घडेल हे आपण सुरुवाती सुरुवातीला सांगू शकतो. पण जेव्हा सिनेमा जसजसा क्लायमॅक्सच्या दिशेने जातो तेव्हा ही प्रेडिक्टॅबिलिटी गायब होते. मैदानचा अर्ध्या तासाचा क्लायमॅक्स पाहणं खाऊ नाहीये. प्रत्येकक्षणी तुमचं रक्त उसळायला लावेल असा हा क्लायमॅक्स आहे. क्लायमॅक्स उंचावर जातो, तेव्हा एका क्षणी आपण कोणती तरी इंटरनॅशनल मॅच लाइव्ह पाहतोय की काय असा भास होतो. या क्लामॅक्सच्या वेळी तर सिनेमागृहात अनेक प्रेक्षक गोल सेव्ह करण्याचा सल्ला देताना दिसले. खुर्चीवर बसल्या बसल्या जल्लोष करताना, किंचाळताना दिसले. आपण सिनेमा पाहतोय हेच लोक विसरले की काय असं दिसत होतं. यावरून हा क्लायमॅक्स किती उंचीवर गेलाय हे दिसून येतं.

शेवट गोड झालाय

सिनेमाचा शेवट अत्यंत चांगला झालाय. साधारणपणे गल्ला वसूल करण्यासाठी अशा सिनेमाचा शेवट अत्यंत ड्रॅमॅटिक केला जातो. पण इथे तसं झालेलं नाही. एआर रहमान यांचं संगीत आणि मनोज मुंतशिर यांच्या शब्दांनी सजलेलं जाने दो बज रहा है… हे गाणं अत्यंत अप्रतिम झालंय. भारतात जेवढे स्पोर्ट्सवर आधारीत सिनेमे झाले त्यामध्ये मैदानमधील प्रयोग अत्यंत वेगळा आणि अनोखा आहे. त्यामुळे हा सिनेमा थिएटरमध्येच जाऊन पाहिला पाहिजे.

देशभक्तीचा गवगवा नाही

या सिनेमात देशभक्तीचा मसाला कुटून भरण्याचा भरपूर स्कोप होता. पण निर्मात्यांनी तसं काही केलं नाही. या सिनेमातील सर्वात जमेची बाजू म्हणजे जोश भरणारे संवाद नाहीत. एखाद्या देशाला कमी लेखून रक्त तापवण्याचे प्रसंग नाहीत. विनाकारण ओरडणारे कलाकार नाहीत. तसेच भारत प्रत्येक क्षेत्रात अव्वलच असल्याचं दाखवण्याचा अट्टाहास नाही. त्यामुळे दिग्दर्शक अमित शर्मा यांना या कारणासाठी तरी एक्स्ट्रा मार्क दिलेच पाहिजे. त्यांच्या मनात आलं असतं तर भारतीयांचे सेंटिमेंट पाहून त्यांनी सिनेमा केलाही असता. पण त्यांनी तसं न करता चांगली स्टोरीटेलिंग आणि कंटेन्टचा वापर केला.

कॅमेरा वर्क लाजवाब

या सिनेमाची कहाणी 50 ते 60 च्या दशकातील आहे. त्यामुळे या सिनेमाचं हे वास्तव पदोपदी अधोरेखित करण्याचं काम केलं गेलंय. त्यासाठी कॅमेरा वर्क अप्रतिम झालं आहे. या सिनेमात स्टिल कॅमेरा वर्क अत्यंत कमी आहे. हँडहेल्ड कॅमेऱ्याचाच अधिक वापर केला गेला आहे. त्यामुळे हा सिनेमा अधिक वास्तववादी झाला आहे. सिनेमात फुटबॉल मॅचच्यावेळी VFX चा प्रचंड वापर करण्यात आला आहे. पण एवढ्या उच्चकोटीची प्लेसिंग पकडणं तितकंच मुश्किल होतं.

निव्वळ कमाल

सध्याच्या आघाडीच्या पाच कलाकारांपैकी आपण सर्वोत्तम आहोत, हे पुन्हा एकदा अजय देवगनने दाखवून दिलं आहे. बाकीचे कलाकार त्याच्या अॅक्टिंग स्किलच्या आसपासही फिरकत नाही. इमोशनल सिक्वेन्स असो की कठोरपणा… कोणत्याही सीनमध्ये अजय देवगनचं काम अत्यंत अप्रतिमच असतं. या सिनेमात बरेच क्लोजअप आहेत. आपल्या अभिनयाच्या बळावर अजयने तेही जाणवू दिलं नाही. सिनेमात अजय देवगन कुठेही अतिरंजीत अभिनय करताना दिसत नाही. या सिनेमाची दुसरी खासियत म्हणजे अजय देवगनचा अभिनय. क्लायमॅक्समध्ये जेव्हा टीममधील मुलं त्यांची गळाभेट घेतात, त्यावेळी अजय देवगनने जे एक्सप्रेशन दिलेत, ते निव्वळ कमाल आहे. जोरदार आहेत.

प्रियमणीकडे अधिक काही विशेष स्कोप नव्हता. त्यांनी अत्यंत कमी स्क्रीनटाइममध्ये आपली छाप सोडली आहे. गजराज सिनेमात मुख्य निगेटिव्ह फोर्स आहे. त्यांनी एका स्पोर्ट्स जर्नलिस्टची भूमिका साकारली आहे. गजराज राव यांनी ही भूमिका अत्यंत दमदारपणे साकारली आहे. इश्तियक खान याचंही काम अत्यंत चांगलं झालंय. त्याशिवाय फुटबॉल टीममधील सर्वच कलाकारांनी चांगलं काम केलंय. कास्टिंग अप्रतिम झालीय. अभिलाष थपलियाल आणि विजय मोर्य नावाचे दोन सरप्राईज एलिमेंटही या सिनेमात आहेत.

काही गोष्टी सुटल्या…

या सिनेमात काही गोष्टी सुटल्या आहेत. त्या नजरेत भरत नाहीत. पण सुटलेल्या कळतात. सिनेमात खेळाडूंवर थोडा फोकस हवा होता. काही लाइट मोमेंटही दाखवायला हवे होते. त्यामुळे ऑडियन्सला ब्रिदिंग स्पेस मिळाला असता. मैदानमध्ये आपल्याला फक्त अजय देवगन दिसतो. हा या सिनेमाचा निगेटिव्ह अस्पेक्ट आहे. सोबतच हा सिनेमा खूप लांबलाय. त्यामुळे काही लोकांना हा सिनेमा चक दे इंडियासारखा वाटू शकतो. पण वास्तव तसं नाहीये. या सिनेमाला ज्या पद्धतीने ट्रीट केलंय, तेच या सिनेमाचं वेगळंपण आहे. हा सिनेमा येत्या 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होतोय. त्यामुळे हा सिनेमा आवश्य पाहिला पाहिजे.