साऊथ फिल्म्सचं यश पाहून बॉलिवूड निर्मात्यांचा थरकाप उडालाय- मनोज वाजपेयी

| Updated on: Apr 28, 2022 | 10:35 AM

पुष्पा', 'RRR' नंतर आता 'केजीएफ: चाप्टर 2' या चित्रपटांच्या हिंदी व्हर्जननेही दणक्यात कमाई केली आहे. लार्जर दॅन लाइफचा अनुभव देणाऱ्या या चित्रपटांना प्रेक्षक-समीक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय.

साऊथ फिल्म्सचं यश पाहून बॉलिवूड निर्मात्यांचा थरकाप उडालाय- मनोज वाजपेयी
Manoj Bajpayee
Image Credit source: Facebook
Follow us on

गेल्या काही महिन्यांपासून दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉलिवूड इंडस्ट्रीवरही आपला मोठा प्रभाव पाडला आहे. ‘पुष्पा’, ‘RRR’ नंतर आता ‘केजीएफ: चाप्टर 2’ या चित्रपटांच्या हिंदी व्हर्जननेही दणक्यात कमाई केली आहे. लार्जर दॅन लाइफचा अनुभव देणाऱ्या या चित्रपटांना प्रेक्षक-समीक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. बॉलिवूडमधील काही कलाकार याविषयी मुलाखतींमध्ये व्यक्त झाले. तर काहींनी दाक्षिणात्य चित्रपटांसमोर बॉलिवूड (Bollywood) का फिकं पडतंय, याची कारणंसुद्धा सांगितली. आता अभिनेता मनोज वाजपेयीनेसुद्धा (Manoj Bajpayee) साऊथ फिल्म इंडस्ट्रीबद्दल (South Film Industry) त्याची मतं मांडली आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशाने बॉलिवूड चित्रपट निर्माते भयभीत झाले आहेत, असं तो म्हणालाय.

कोरोना महामारी आणि लॉकडाऊननंतर सुरुवातीला अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 106 कोटींची कमाई केली. त्यानंतर एस. एस. राजामौली यांच्या ‘RRR’ आणि यशच्या ‘केजीएफ : चाप्टर 2’ या चित्रपटांनी नवीन विक्रम रचले. या दोन्ही चित्रपटांच्या हिंदी व्हर्जनने कमाईचा 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. अजूनही या चित्रपटांना थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय. यामुळे बॉलिवूडमध्ये तणाव निर्माण झाल्याचं निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मासह इतरही काही जणांनी म्हटलंय.

“बॉलिवूड निर्मात्यांचा थरकाप उडालाय”

दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशाबद्दल बोलताना मनोज वाजपेयी म्हणाला, “हे चित्रपट एकानंतर एक ब्लॉकबस्टर ठरत आहेत. मनोज वाजपेयी आणि माझ्यासारख्यांना एका मिनिटासाठी विसरून जा, पण या चित्रपटांनी मुंबई चित्रपटसृष्टीतील सर्व मुख्य प्रवाहातील चित्रपट निर्मात्यांचा थरकाप उडवला आहे. त्यांना खरंच कुठे पहावं हे सुचत नाहीये.” या चित्रपटांचं यश म्हणजे हा बॉलिवूडसाठी एक धडा आहे, असंही त्याने म्हटलंय.

“बॉलिवूडसाठी हा एक धडा”

“ते त्यांच्या कामाबद्दल खूपच प्रामाणिक आहेत. चित्रपटासाठी ते अक्षरश: स्वत:ला वाहून घेतात. एखादं काम करायचंय म्हणून नाही तर ते काम जगातील सर्वोत्कृष्ट आहे असं समजून ते सीन शूट करतात. ते त्यांच्या प्रेक्षकांना अजिबात गृहित धरत नाही आणि प्रेक्षकवर्ग हा त्यांच्यासाठी सर्वोच्च स्थानी आहे. तुम्ही पुष्पा, RRR किंवा केजीएफ 2 पाहिलात तर त्यातील प्रत्येक फ्रेम हा आयुष्यातील शेवटचा फ्रेम असं समजून शूट केला गेलाय. जणू हा जीवन-मरणाचा प्रश्न आहे असं समजून त्यावर मेहनत घेतली आहे. आपल्याकडे याच गोष्टीची कमतरता आहे. आपण पैसा आणि बॉक्स ऑफिस या दोनच गोष्टींचा विचार करून मेनस्ट्रीम चित्रपट बनवतो. आपण स्वत:वर टीका करू शकत नाही, म्हणून आपल्यापेक्षा ते वेगळे आहेत असं आपण ठरवतो. पण हा एक धडा आहे. मुंबई इंडस्ट्रीतील मुख्य प्रवाहातील चित्रपट निर्मात्यांनी मुख्य प्रवाहातील सिनेमे कसे बनवायचे याचा हा धडा आहे”, असं मनोज म्हणाला.