Ranbir Alia: मध्य प्रदेशच्या मंत्र्यांकडून रणबीर-आलियाला सल्ला; म्हणाले “अशा शब्दांचा वापरच..”

| Updated on: Sep 07, 2022 | 4:38 PM

अयान मुखर्जीने मंदिरात दर्शन घेतलं. आलिया आणि रणबीरलाही दर्शन घेण्यासाठी सांगितलं गेलं. मात्र विरोध प्रदर्शनामुळे त्यांनी मंदिरात न जाण्याचा निर्णय घेतला, असं मिश्रा म्हणाले.

Ranbir Alia: मध्य प्रदेशच्या मंत्र्यांकडून रणबीर-आलियाला सल्ला; म्हणाले अशा शब्दांचा वापरच..
Ranbir Kapoor, Alia Bhatt
Image Credit source: Instagram
Follow us on

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे दोन दिवस राहिले आहेत. या चित्रपटाचं दोघांकडून जोरदार प्रमोशन केलं जातंय. नुकतेच हे दोघं दिग्दर्शक अयान मुखर्जीसोबत उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात (mahakaleshwar temple) दर्शनासाठी गेले होते. मात्र दर्शनापूर्वीच त्यांना रोखलं गेल्याच्या चर्चा होत्या. रणबीर-आलियाला मंदिरात दर्शन घेऊ दिलं नाही असं म्हटलं जात होतं. त्यावर आता मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रणबीर-आलियाला दर्शनासाठी नाकारल्याच्या चर्चांना त्यांनी फेटाळलं आहे.

अयान मुखर्जीने मंदिरात दर्शन घेतलं. आलिया आणि रणबीरलाही दर्शन घेण्यासाठी सांगितलं गेलं. मात्र विरोध प्रदर्शनामुळे त्यांनी मंदिरात न जाण्याचा निर्णय घेतला, असं मिश्रा म्हणाले. मंगळवारी रणबीर, आलिया आणि अयान हे उज्जैनला पोहोचले होते. मात्र बीफबद्दल रणबीरच्या जुन्या वक्तव्यामुळे त्यांच्याविरोधात मंदिराबाहेर जोरदार निदर्शनं करण्यात आली. यामुळेच रणबीर आणि आलिया हे उज्जैनला जाऊनसुद्धा महाकाल मंदिरात देवाचं दर्शन घेऊ शकले नाहीत.

हे सुद्धा वाचा

या संपूर्ण प्रकरणाविषयी नरोत्तम मिश्रा म्हणाले, “मी प्रशासनाशी बोललो. त्यांनी मला सांगितलं की रणबीर-आलिया यांच्यासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. मात्र त्यांनीच दर्शन न घेण्याचा निर्णय घेतला. निदर्शनांचा मुद्दा असू शकतो, मात्र हा वेगळा विषय आहे. त्यांना दर्शन घेण्यापासून कोणीच रोखलं नव्हतं. त्यांच्यासोबत जे इतर लोक आले होते, त्यांनी दर्शन घेतलं. दिग्दर्शक अयान मुखर्जीनेही दर्शन घेतलं. कलाकारांनी अशा शापित शब्दांचा वापर केला नाही पाहिजे, ज्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातील.”

पत्रकारांशी बोलतानाचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करत नरोत्तम मिश्रा यांनी लिहिलं, ‘अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्यासाठी महाकाल बाबांचं दर्शन घेण्याची पूर्ण व्यवस्था उज्जैन प्रशासनाने केली होती. मात्र प्रशासनाने आग्रह केल्यानंतरही रणबीर आणि आलिया स्वत: दर्शनासाठी गेले नव्हते. लोकांच्या भावना दुखावल्या जातील, असं वक्तव्य कलाकारांनी नाही केलं पाहिजे.’ महाकाल मंदिराबाहेर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनास सुरुवात केली होती. हातात काळे झेंडे घेऊन निदर्शनं करण्यात आली.