Ranveer Singh: न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीरने मुंबई पोलिसांकडे मागितली दोन आठवड्यांची मुदत

रणवीर सिंगच्या या न्यूड फोटोशूटवर महिला आयोगानेही आक्षेप घेतला होता. तर दुसरीकडे रणवीर सिंगच्या समर्थनार्थ अनेक बॉलिवूड स्टार्स उभे राहिले.

Ranveer Singh: न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीरने मुंबई पोलिसांकडे मागितली दोन आठवड्यांची मुदत
Ranveer Singh
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 21, 2022 | 5:17 PM

गेल्या महिन्यात अभिनेता रणवीर सिंगने (Ranveer Singh) ‘पेपर’ या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या कव्हर पेजसाठी न्यूड फोटोशूट (Nude Photoshoot) केलं होतं. त्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले होते आणि त्याच्यावर जोरदार टीकाही झाली होती. याप्रकरणी त्याच्या चौकशीसाठी मुंबई पोलीस त्याच्या घरी पोहोचले होते, मात्र त्यावेळी तो घरी नव्हता. पोलिसांनी रणवीर सिंगला 22 ऑगस्टपर्यंत जबाब नोंदवण्यास सांगितलं होतं. आता रणवीरने मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे.

रणवीरने पोलिसांना दोन आठवड्यांची मुदत मागितली

रणवीरला समन्स बजावण्यासाठी मुंबई पोलीस त्याच्या घरी पोहोचले होते, मात्र त्यावेळी तो घरी उपस्थित नव्हता. तो शूटिंगसाठी शहराबाहेर गेला होता. पोलिसांना समन्स न सोपवताच परतावं लागलं होतं. मात्र, मुंबई पोलीस पुन्हा त्याच्या घरी जाऊन नोटीस देणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्याआधीच रणवीरच्या बाजूने ही बातमी समोर आली आहे. याप्रकरणी 22 ऑगस्टला रणवीर चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहणार होता.

‘पेपर’ मासिकाच्या कव्हर पेजसाठी केलं होतं फोटोशूट

गेल्या महिन्यात रणवीरने ‘पेपर’ या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केलं होतं, ज्यानंतर त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं होतं. ट्रोल झाल्यानंतर रणवीर सिंगने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, ‘हे माझं आयुष्य आहे आणि मी माझं काम कोणत्याही प्रकारे करू शकतो. मला वाटल्यास मी हजार लोकांसमोर न्यूड होऊ शकतो आणि त्यामुळे मला काही फरक पडत नाही. पण मी असं केलं तर लोकांची गैरसोय होईल.”

न्यूड फोटोशूटवर अद्याप दीपिकाचं मौन

रणवीर सिंगच्या या न्यूड फोटोशूटवर महिला आयोगानेही आक्षेप घेतला होता. तर दुसरीकडे रणवीर सिंगच्या समर्थनार्थ अनेक बॉलिवूड स्टार्स उभे राहिले. तसंच काही जणांनी त्याची जोरदार स्तुती केली. फोटोशूटच्या एका दिवसानंतर रणवीर सिंगने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचे फोटो शेअर केले होते. रणवीरची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.