अभ्यासात मन नाही लागत, काय करू? विचारणाऱ्याला शाहरुख खानचं भन्नाट उत्तर

| Updated on: Mar 03, 2022 | 9:23 AM

शाहरुखने (Shah Rukh Khan) ट्विटरवर 'आस्क मी एनिथिंग' (AMA) या सेशनद्वारे चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी अनेकांनी शाहरुखला त्याच्या चित्रपटाविषयी प्रश्न विचारले. त्यापैकी एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाने विशेष लक्ष वेधून घेतलं.

अभ्यासात मन नाही लागत, काय करू? विचारणाऱ्याला शाहरुख खानचं भन्नाट उत्तर
Shah Rukh Khan
Image Credit source: Instagram/ Shah Rukh Khan
Follow us on

बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) त्याच्या आगामी ‘पठाण’ (Pathan) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. बुधवारी त्याने ट्विटरवर या चित्रपटाचा टीझर पोस्ट केला. 25 जानेवारी 2023 रोजी हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर शाहरुखचा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने चाहत्यांमध्ये त्याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. यानिमित्त शाहरुखने ट्विटरवर ‘आस्क मी एनिथिंग’ (AMA) या सेशनद्वारे चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी अनेकांनी शाहरुखला त्याच्या चित्रपटाविषयी प्रश्न विचारले. त्यापैकी एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाने विशेष लक्ष वेधून घेतलं. ‘अभ्यासात मन नाही लागत सर, काय करू’, असा प्रश्न एका विद्यार्थ्याने शाहरुखला विचारला. त्यावर किंग खाननेही भन्नाट उत्तर दिलं. शाहरुखच्या याच उत्तराची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

‘दिमाग ट्राय कर शायद वर्क करेगा.. मन प्यार के लिए रख’ (डोकं लावून अभ्यास कर, कदाचित हे कामी येईल. मन प्रेमासाठी जपून ठेव) असं उत्तर शाहरुखने त्या विद्यार्थ्याला दिलं. शाहरुखचं ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन नेहमीच त्याच्या भन्नाट उत्तरांमुळे चर्चेत असतं. याआधीही त्याने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं मजेशीरपणे दिली आहेत. ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी इतका वेळ का घेतला? थोडं लवकर प्रदर्शित करा ना, असं एका चाहत्याने लिहिलं. त्यावर शाहरुख मस्करीत त्याला म्हणाला, ‘अर्धाच चित्रपट प्रदर्शित करू का?’

शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत. टीझरमध्ये या दोघांची झलक पहायला मिळते. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ या चित्रपटानंतर शाहरुखने मोठा ब्रेक घेतला. ‘झिरो’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला होता. यामध्ये कतरिना कैफ आणि अनुष्का शर्माने शाहरुखसोबत काम केलं होतं. आता तब्बल चार वर्षांनंतर शाहरुखचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा: 

शाहिद कपूरच्या बहिणीचा लग्नसोहळा; महाबळेश्वरमध्ये ‘या’ स्टारकिडशी बांधली लग्नगाठ

‘पावनखिंड’वर मोहन भागवतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा..”

“20-30 वर्षांत जे आमच्याकडून नाही झालं, ते नागराजने करून दाखवलं”; आमिर खानचे डोळे पाणावले