पहिल्या नजरेतील प्रेमाची सुरेल कहाणी, 31 वर्षांपूर्वीच्या गाण्याची जादू आजही कायम
'बॉम्बे' चित्रपटातील 'कहना ही क्या' हे ए.आर. रहमानच्या संगीताने आणि चित्राच्या आवाजाने सजलेले अजरामर गीत आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. मनीषा कोईराला व अरविंद स्वामी यांच्यावर चित्रित झालेले हे पहिले-नजरेतील प्रेम दर्शवणारे गीत अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये आवर्जून असतं.

काही गाणी अशी असतात जी कानावर पडताच एक सुकून मिळतो. त्याचे बोल, त्याचं सुमधुर संगीत आपलं मन खुश करतं. 1995 साली रिलीज झालेल्या ‘बॉम्बे’ या चित्रपटातील तशी तर सगळीच गाणी गाजली, अनेकांना या चित्रपटातील बहुतांश गाणी आवडतात. पण त्यातलं एक गाणं अनेकांसाठी खूप खास आहे, ते म्हणजे ‘कहना ही क्या’ . आजही ते आठवणीतल्या गाण्यांमध्ये समाविष्ट आहे, अनेकांच्या प्ले लिस्टमध्ये हे गीत आवर्जून असतं. ए.आर. रहमानचं संगीत आणि चित्रा यांच्या आवाजाने बनलेल्या या गाण्याला वेगळीच ओळख मिळाली. अभिनेत्री मनिषा कोईरालाचा साधेपणा आणि तितकंच तिचं मोहून घेणारं सौंदर्य याने अनेक जण घायाळ झाले. या चित्रपटात देखणा हिरो अरविंद स्वामी याचीही प्रमुख भूमिका होती.
खरंतर हे गाणं ‘बॉम्बे’च्या ‘कन्नलाने’ या तामिळ गीताचं हिंदी व्हर्जन आहे. पण तामिळ आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये हे गाणं खूपच गाजलं. विशेष म्हणजे ‘कहना ही क्या’ या गाण्याला द गार्डियनच्या ‘1000 Songs Everyone Must Hear’मध्ये स्थान मिळालं होतं.
पहिल्या नजरेतील प्रेम दर्शवणारं सुमधुर गीत
‘बॉम्बे’ चित्रपटातील ‘कहना ही क्या’ हे गाणं एका लग्नाच्या सिक्वेन्समध्ये शूट करण्यात आलं होतं. या दरम्यान मनीषा कोईराला आणि अरविंद स्वामी हे एकमेकांना पहिल्यांदा पाहतात आणि पहिल्याच नजरेत प्रेमात पडतात. मनीषाचा डान्स आणि तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव, प्रेक्षकांचं लक्ष खिळवून ठेवतात. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे मोठमोठ्या संवादातून नव्हे तर नजरेचा खेळ आणि भावनांद्वारे या गाण्यातून प्रेम दाखवण्यात आलं. केएस चित्रा यांनी या गाण्याला आवाज दिला. ए. आर. रेहमान यांनी या पिक्चरला संगीत दिलं. ‘कहना ही क्या’चे बोल हे प्रसिद्ध गीतकार महबूब यांनी लिहीले होते.
तामिळ व्हर्जनही खास
‘कहना ही क्या’चं मूळ व्हर्जन हे ‘कन्नलाने’ हे तामिळ गाणं होतं. याचे बोल वैरामुथुने लिहीले. तेही चित्रा यांनीच गायलं. ‘बॉम्बे’पिक्चरचं तामिळ व्हर्जन हिंदीपूर्वी डिसेंबर 1994 मध्ये रिलीज झालं. त्यानंतर 1995 साली चित्रपट आणि संगीत हिंदील आणि तेलुगु मध्ये आले. या गाण्यासाठी चित्रा यांना तामिळनाडु स्टेट फिल्म अवॉर्ड चा बेस्ट फीमेल सिंगर हा पुरस्कार मिळाला.
‘बॉम्बे’चं दिग्दर्शन
‘बॉम्बे’चे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केलं होतं. या चित्रपटात अरविंद स्वामी आणि मनीषा कोईराला मुख्य भूमिकेत होते. वेगवेगळ्या धर्मांतून आलेल्या दोघांच्या प्रेमकहाणीने कथा सुरू होते. दोघे लग्न करून मुंबईत येतात. 1992-93 च्या मुंबई दंगलींच्या पार्श्वभूमीवर कुटुंब आणि नातेसंबंधांवर होणारा परिणाम चित्रपटात दाखवण्यात आला आहे. हे गाणं भारतातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय आहे.