
सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. प्रेक्षक-समिक्षकांकडून या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळतोय. 1997 मध्ये जे. पी. दत्ता यांचा ‘बॉर्डर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर तो सुपरहिट ठरला होता. त्याचाच हा सीक्वेल आहे. या सीक्वेलमध्ये सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत. यापैकी एका अभिनेत्याकडे एकेकाळी थिएटरमध्ये ‘बॉर्डर’ हा चित्रपट बघायला जाण्यासाठी पैसे नव्हते. तोच आता सीक्वेलमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या अभिनेत्याने याविषयीचा खुलासा केला आहे. 23 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर 2’ने आतापर्यंत 50 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.
प्रसिद्ध गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की जेव्हा ‘बॉर्डर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा त्याच्याकडे तो चित्रपट पाहण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे तो चित्रपटाचं तिकिट खरेदी करू शकत नव्हता. दिलजीतचं कुटुंब त्यावेळी आर्थिक समस्यांचा सामना करत होतं. त्यावेळी दिलजीतला हा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याची प्रचंड उत्सुकता होती. परंतु तिकिट खरेदी करायलाही पैसे नसल्यामुळे तो हा चित्रपट थिएटरमध्ये पाहू शकला नव्हता. दिलजीतने आपल्या कलेच्या आणि मेहनतीच्या जोरावर आज इतकं नाव कमावलंय की ‘बॉर्डर’च्या सीक्वेलमध्ये तो थेट मुख्य अभिनेता साकारतोय.
“बॉर्डर 2 मध्ये फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखों यांची भूमिका साकारून माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मला ही भूमिका साकारताना अत्यंत अभिमान वाटतोय. ज्यांनी निर्मलजीत सिंह सेखों यांच्याविषयी काही वाचलं नसेल, तर त्यांनी आवर्जून हा चित्रपट पहावा आणि त्यांच्या बलिदानाची कहाणी जवळून समजून घ्यावी”, असं तो म्हणाला.
‘बॉर्डर 2’मधील दिलजीतच्या भूमिकेची घोषणा झाल्यानंतर बराच वाद निर्माण झाला होता. यामागचं कारण म्हणजे दिलजीतने त्याच्या ‘सरदारजी 3’ या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत भूमिका साकारली होती. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारासोबत काम केल्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका झाली होती. इतकंच नव्हे तर त्याला ‘बॉर्डर 2’मधून काढून टाकण्याचीही मागणी झाली होती.