
Border 2 Teaser : सनी देओल, दिलजित दोसांझ, वरुण धवन आणि अहान शेट्टी यांच्या भूमिका असलेला ‘बॉर्डर 2’ हा 2026 चा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटांपैकी एक आहे. 16 डिसेंबर रोजी ‘विजय दिवसा’चं औचित्य साधत या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. 1971 च्या युद्धातील भारताच्या विजयाची आठवण करून देणाऱ्या या ऐतिहासिक दिनी ‘बॉर्डर 2’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यातील सनी देओलचा आवाज, युद्धाची दृश्ये आणि पार्श्वसंगीत अंगावर काटा आणणारा आहे. हा टीझर प्रदर्शित होताच त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
1971 चं भारत-पाकिस्तान युद्ध.. या शब्दाने टीझरची सुरुवात होते. त्यानंतर युद्धाचा सायरन आणि सनी देओलच्या पोलादी आवाजातील डायलॉग ऐकू येतो. “तुम जहां से भी घुसने की कोशिश करोगे, आसमान से, जमीन से, समंदर से, सामने एक हिंदुस्तानी फौजी खड़ा पाओगे, जो आंखों में आंखें डालकर सीना ठोककर कहेगा, हिम्मत है तो आ ये खड़ा है हिंदुस्तान,” असा हा डायलॉग आहे. या डायलॉगसोबतच वरुण, दिलजित आणि अहान यांच्या भूमिकांची झलक पहायला मिळते. एका दृश्यात सनी देओल सैन्याला विचारतो, “आवाज कहां तक जानी चाहिए?” (आवाज कुठपर्यंत पोहोचला पाहिजे?) त्यावर सैनिकांचं एकमुखी उत्तर ऐकू येतं, “लाहोरपर्यंत..”
‘बॉर्डर 2’ हा 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर ‘बॉर्डर’ या चित्रपटाचा सीक्वेल आहे. या सीक्वेलमध्ये सनी देओल शीख व्यक्तीरेखेत आहे. तर दिलजितची भूमिका भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर आणि परमवीर चक्र विजेते निर्मलजीत सिंग सेखों यांच्यावर आधारित आहे. वरुण धवनची भूमिका भारतीय लष्कराचे परमवीर चक्र विजेते कर्नल होशियार सिंग दहिया यांच्यापासून प्रेरित आहे. जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘बॉर्डर’ हा चित्रपट 1971 मध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान लोंगेवाला पोस्टवर झालेल्या लढाईवर आधारित होता.
‘बॉर्डर 2’च्या टीझरवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘वाह काय टीझर आहे! आगच नाही तर थेट ज्वालामुखी पेटवणार. मास्टरपीस ठरेल’ असं एकाने लिहिलं. तर ‘सनी देओलचा आवाज ऐकूनच अंगावर काटा आला’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘आवाज कहां तक जानी चाहिए- लाहोर तक हा डायलॉग हिट ठरणार’ असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.