सेलीना जेटली प्रकरण आता थेट कोर्टात, पतीच्या अडचणी वाढल्या, नेमकं काय घडतंय?

Celina Jaitly: सध्या बॉलिवूड अभिनेत्री सेलीना जेटली खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने पतीवर कौटुंबिक हिसांचाराचा आरोप केला आहे. आता हे प्रकरण मुंबई कोर्टात आले आहे. आजच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय झालं चला जाणून घेऊया...

सेलीना जेटली प्रकरण आता थेट कोर्टात, पतीच्या अडचणी वाढल्या, नेमकं काय घडतंय?
Celina Jaitly
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 12, 2025 | 5:43 PM

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री सेलीना जेटली ही खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सेलीनाने पती पीटर हागवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. न्याय मिळवण्यासाठी तिने कोर्टात देखील धाव घेतली आहे. आता हे प्रकरण मुंबईच्या अंधेरी कोर्टात सुनावणीसाठी आले आहे. हे प्रकरण न्यायिक मजिस्ट्रेट प्रथम श्रेणी एस. सी. ताडये यांच्या कोर्टात होते. सुनावणी सुरू झाल्यावर पीटर हाग यांच्या वकिलांनी कोर्टात हजर होऊन उपस्थिती नोंदवली. आज कोर्टात नेमकं काय झालं? जाणून घ्या…

कोर्टाने दोन्ही बाजूंना काही आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी वेळ दिली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार सेलीना जेटली आणि पीटर हाग दोघांनाही आपल्या उत्पन्नाशी संबंधित कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. यासोबतच पीटर हाग यांना त्यांचे सविस्तर उत्तर दाखल करण्यासाठीही वेळ दिली गेली आहे. कोर्टाने सांगितले की, कागदपत्रे दाखल झाल्यानंतर पुढील तारखेला दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकले जाईल. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ जानेवारीला होईल.

दोन्ही बाजूंच्या कायदेशीर टीम हजर

पीटर हाग यांच्या बाजूने कोर्टात इंडस लॉच्या वकिलांच्या टीमने हजेरी लावली. या टीमचे नेतृत्व वकील वरुण टंडन करत आहेत. त्यांच्या बाजूने कोर्टाला सांगितले गेले की ते कायद्यानुसार उत्तर दाखल करतील आणि निश्चित तारखेला तयार राहतील. दुसरीकडे अभिनेत्री सेलीना जेटली यांच्या बाजूने करंजावाला अँड कंपनीची कायदेशीर टीम उपस्थित होती. त्यांच्या टीममध्ये सीनियर अॅडव्होकेट संदीप कपूर, प्रिन्सिपल अॅसोसिएट निहारिका करंजावाला मिश्रा आणि वरिष्ठ अॅसोसिएट रितिम वोहरा आहूजा सामील होते. यासोबतच मुंबईचे स्थानिक वकील अर्पण राजपूत आणि हिनाल संघवीही हजर होते.

सोशल मीडियावर लिहिली होती पोस्ट

सध्या कोर्टाने दिलेल्या सूचनांनंतर आता सगळ्यांचे लक्ष २७ जानेवारीच्या सुनावणीवर आहेत. या सुनावणीसाठी उत्पन्नाची कागदपत्रे आणि उत्तर दाखल झाल्यानंतर पुढील पाऊल ठरेल. कौटुंबिक संकटाच्या मध्येच सेलीनाने पतीवर घरगुती हिंसेचा आरोप केला, घटस्फोटावर भावनिक पोस्ट लिहित सर्वांचे लक्ष वेधले.