‘चक दे इंडिया’ फेम दिग्गज अभिनेते रमाकांत दयामा यांचं निधन, बॉलिवूडमध्ये हळहळ

'चक दे इंडिया', 'स्कॅम 1992' यांसारख्या चित्रपट, वेब सीरिज आणि विविध मालिकांमध्ये भूमिका साकारलेले दिग्गज अभिनेते रमाकांत दयामा यांचं निधन झालं आहे. अभिनेत्री शुभांगी लाटकर यांनी पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली आहे.

चक दे इंडिया फेम दिग्गज अभिनेते रमाकांत दयामा यांचं निधन, बॉलिवूडमध्ये हळहळ
Ramakant Dayama
Image Credit source: Instagram
| Updated on: May 26, 2026 | 1:29 PM

अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते रमाकांत दयामा यांचं आज (26 मे 2026) निधन झाल आहे. अभिनेत्री शुभांगी लाटकर यांनी सोशल मीडियावर त्यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करत निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या व्हिडीओमध्ये रमाकांत हे इतर कलाकारांसोबत गाताना आणि नाचताना दिसत आहेत. या व्हिडीओसोबत शुभांगी यांनी पोस्ट लिहून रमाकांत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘मी नि:शब्द झाले आहे. आज आपण एक खरोखरच सुंदर व्यक्ती गमावली आहे’, अशा शब्दांत त्यांनी दु:ख व्यक्त केलं. रमाकांत हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते.

शुभांगी लाटकर यांची पोस्ट-

‘रमाकांत दयामा हे माझे केवळ एक प्रिय मित्र आणि फॅमिली फ्रेंडच नव्हते, तर एक अशी व्यक्ती होते, ज्यांचं मी मनापासून कौतुक आणि आदर करत होते. आपुलकी आणि ऊर्जेने परिपूर्ण असलेले ते प्रत्येक समस्येतही जीवनाचा आनंद कसा घ्यायचा हे खऱ्या अर्थाने जाणत होते. एक उत्स्फुर्त डान्सर, भावपूर्ण गायक, उत्कृष्ट अभिनेते आणि माझ्यासाठी एक असे हुशार सल्लागार, ज्यांच्या शब्दांना नेहमीच वजन असे. ते दिसायला जरी लहान असले तरी माझ्या लेखी ते सर्वांत कणखर आणि धाडसी व्यक्तींपैकी एक होते’, असं शुभांगी यांनी लिहिलंय.

रमाकांत यांच्या आजारपणाबद्दल त्यांनी पुढे म्हटलंय, ‘ते अनेक महिन्यांपासून आजारी होते हे आम्हा सर्वांना माहीत असूनही मनात कुठेतरी आशा कधीच कमी झाली नव्हती. आमचे अनेक प्लॅन्स अपूर्ण राहिले आहेत. इतक्या वर्षांनंतर मला त्यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची मनापासून इच्छा होती. आम्ही एकत्र एका सुंदर हिंदी नाटकात काम करायचं ठरवलं होतं. जेव्हा मी त्यांना विनंती केली, तेव्हा ते हसून म्हणाले की, मला लवकर बरं होऊ दे. आम्ही रंगमंचावर एकत्र निवडक सुंदर कविता सादर करण्याचाही विचार केला होता. ते स्वप्नही आता अपूर्णच राहिलं आहे.’

‘काही गोष्टी गमावल्यानंतर मनात एक अशी शांतता पसरते, जी शब्दांत व्यक्त करता येत नाही. आजचा दिवस तसाच काहीसा आहे. रमाकांतजी, आम्हाला तुमची खूप उणीव जाणवेल. तुमचं प्रेम, तुमचं धैर्य, तुमची कला आणि तुमचा सुंदर आत्मा आमच्या हृदयात सदैव जिवंत राहील. तुमच्या आत्म्यास शांती लाभो’, अशा शब्दांत शुभांगी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Follow Us