‘छावा’समोर ‘पुष्पा’ला झुकावंच लागलं..; आणखी एक रेकॉर्ड विकी कौशलच्या नावे

विकी कौशलच्या 'छावा'ने प्रदर्शनाच्या तिसऱ्या शुक्रवारी अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'ला झुकवलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचले आहेत.

छावासमोर पुष्पाला झुकावंच लागलं..; आणखी एक रेकॉर्ड विकी कौशलच्या नावे
विकी कौशल, रश्मिका मंदाना
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 02, 2025 | 11:52 AM

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचतोय. 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली आहे. आता प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यातही ‘छावा’ची दमदार कमाई सुरू आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 16 व्या दिवशी (1 मार्च, 2025) 21 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर पंधराव्या दिवशी या चित्रपटाची कमाई 13 कोटी रुपये झाली होती. सोळाव्या दिवसाच्या कमाईत थेट 61 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 433.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कमाईसह ‘छावा’ आता देशातील 12 सर्वांत हिट चित्रपटांच्या यादीत पोहोचला आहे. या यादीत ‘छावा’ने ‘2.0’ आणि ‘सलार: पार्ट वन- सीझफायर’ या चित्रपटांना मागे टाकलं आहे.

छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवणाऱ्या या चित्रपटाने महाराष्ट्रात आधीच इतिहास रचला आहे. ‘छावा’ हा राज्यातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2: द राईज’ या चित्रपटाला ‘छावा’ने मागे टाकलं आहे. ‘पुष्पा 2’ने महाराष्ट्रातत 250 कोटी रुपयांची कमाई केली होती. इतकंच नव्हे तर प्रदर्शनाच्या तिसऱ्या शुक्रवारच्या कमाईच्या बाबतीतही विकी कौशलच्या चित्रपटाने अल्लू अर्जुनच्या चित्रपटाला मागे टाकलं आहे. ‘छावा’ने प्रदर्शनाच्या तिसऱ्या शुक्रवारी 13 कोटी रुपयांचा गल्ला जमवला, तर ‘पुष्पा 2’ने 11.30 कोटी रुपये कमावले होते. असं असलं तरी जगभरातील कमाईच्या बाबतीत अद्याप ‘पुष्पा 2’च अग्रस्थानी आहे. ‘पुष्पा 2’ने जगभरात 1742.1 कोटी रुपये कमावले आहेत. तर ‘छावा’ची आतापर्यतची जगभरातील कमाई ही 590 कोटींवर पोहोचली आहे.

अभिनेता विकी कौशलने ‘छावा’ या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने दहा कोटी रुपयांचं मानधन घेतल्याचं कळतंय. मानधनाचा हा आकडा त्याच्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाच्या फी पेक्षाही कमी आहे. ‘उरी’साठी त्याने 12 कोटी रुपये मानधन घेतलं होतं. तर ‘छावा’ या चित्रपटाचा एकूण बजेट हा 130 ते 140 कोटी रुपये आहे. ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला तरी विकी कौशलचं मानधन हे इतर सुपरस्टार्सच्या तुलनेत खूपच कमी आहे.

  • शाहरुख खान, सलमान खान- एका चित्रपटासाठी 100 ते 150 कोटी रुपये
  • आमिर खान- एका चित्रपटासाठी 100 ते 275 कोटी रुपये मानधन
  • अल्लू अर्जून- ‘पुष्पा 2’साठी 300 कोटी रुपये मानधन