
Chhaava Box Office Collection Day 17: अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमापुढे बॉक्स ऑफिस देखील नतमस्तक झालं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौऱ्यावर आधारित ‘छावा’ सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला सिनेमा सलग 17 व्या दिवशी देखील बक्कळ कमाई करताना दिसत आहे. ‘छावा’ सिनेमाचा फक्त भारतात नाही तर, महाराष्ट्रात देखील बोलबाला पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर, ‘छावा’ सिनेमाच्या यशापुढे ‘सुपरबॉयज ऑफ मालेगांव’ आणि ‘क्रेझी’ या दोन सिनेमांना मोठा फटका बसला आहे.
‘छावा’ सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 31 कोटी रुपयांचा गल्ला जमा केली. सिनेमा गेल्या 17 दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. 17 व्या दिवशी म्हणजे रविवारी देखील सिनेमाने मोठी मजल मारली आहे. ‘छावा’ सिनेमाने ‘बाहुबली’ सिनेमाच्या लाईफटाईम कलेक्शनवर देखील मात केली आहे. ‘बाहुबली’ सिनेमाने 421 कोटींची कमाई केली होती.
रिपोर्टनुसार, सिनेमाने 17 व्या दिवशी 25 कोटींची कमाई केली आहे. तर शनिवारी सिनेमाने जवळपास 22 कोटींची कमाई केली आहे. सलग तीन आठवडे सिनेमा चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसत आहे. गेल्या 17 दिवसांमध्ये ‘छावा’ सिनेमाने भारतात जवळपास 459.50 कोटी रुपयांचा गल्ला केला आहे.
‘छावा’ सिनेमाच्या जगभरातील सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाने 600 कोटींचा टप्पा पार केला आहे. परदेशात सिनेमाने शनिवारी 75 कोटींची कमाई केली. रविवारपर्यंत सिनेमाने जगभरात 620 कोटींची कमाई केल्याची माहिती समोर येत आहे.
दिग्दर्शिका रीमा कागती दिग्दर्शित ‘सुपरबॉयज ऑफ मालेगाव’ सिनेमाचं विश्लेषकांनी देखील कौतुक केलं आहे. पण बॉक्स ऑफिसवर सिनेमा फेल ठरला आहे. सिनेमाने आतापर्यंत फक्त 1.82 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
‘क्रेझी’ सिनेमा देखील मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सिनेमात सोहम शाह, निमिषा सजयन, टीनू आनंद, शिल्पा शुक्ला आणि उन्नति खुराना मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाने रविवारी 1.50 कोटींची कमाई केली. तर सिनेमाने आतापर्यंत फक्त 3.85 कोटींची कमाई केली आहे.