
दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी हे त्यांच्या एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात स्क्रीनवर चिरंजीवी यांचा नात क्लिनकारासोबतचा फोटो दाखवण्यात आला. या फोटोवर प्रतिक्रिया देताना चिरंजीवी जे काही म्हणाले, त्यावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. “मला माझं घर म्हणजे लेडीज हॉस्टेल असल्यासारखं वाटतं. मी मुलगा रामचरणला बोललोय की आपला वारसा पुढे नेण्यासाठी एका तरी मुलाला जन्म घाल” असं ते मस्करीत म्हणाले. मात्र त्यांची ही मस्करीच त्यांना महागात पडली आहे. रामचरणची पत्नी उपासना कोनिडेलाने 20 जून 2023 रोजी मुलीला जन्म दिला. लग्नाच्या 11 वर्षांनंतर रामचरणच्या घरात पाळणा हलला. मात्र नातीवरून चिरंजीवी यांनी केलेली टिप्पणी काही नेटकऱ्यांना अजिबात आवडली नाही.
कार्यक्रमात स्क्रीनवर नातीसोबतचा फोटो पाहून चिरंजीवी हसत म्हणाले, “घरात मला नातींसोबत असल्यासारखं वाटत नाही, तर लेडीज हॉस्टेल किंवा वॉर्डनसारखं वाटतं. माझ्या अवतीभोवती सगळ्या मुलीच मुली असतात. मी मुलगा रामचरणला विनंती केली की यावेळी कृपया एखाद्या मुलाला जन्माला घाल. तो आपला वारसा पुढे नेण्याची इच्छा आहे. पण माझी ही नात खूप गोड आहे. पण पुन्हा मुलगी होते की काय ही मला भीती आहे.” त्यांची ही प्रतिक्रिया ऐकून उपस्थित प्रेक्षक आणि चिरंजीव यांच्या बाजूलाच बसलेले दिग्गज दाक्षिणात्य अभिनेते ब्रह्मानंदम हसू लागतात. मात्र सोशल मीडियावर चिरंजीवी यांच्यावर टीका होऊ लागली आहे.
‘घराला गर्ल्स हॉस्टेल म्हणणं आणि मुलाला पुन्हा मुलगी होईल अशी भीती व्यक्त करणं यावरूनच तुमचे विचार आणि व्यक्तिमत्त्व दिसून येतंय’, असं एकाने लिहिलं. तर ‘2025 मध्येही मुलगा-मुलगी यांच्यात मतभेद केले जातायत, तेसुद्धा सुपरस्टारकडून’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘मुलगा-मुलगी यात मतभेद करून तुम्ही समाजात चुकीचा संदेश पसरवत आहात’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.
रामचरण आणि उपासना यांनी 2012 मध्ये लग्न केलं. मात्र बाळाच्या निर्णयासाठी दोघांनी मिळून वेळ घेतला. अखेर लग्नाच्या 11 वर्षांनंतर 2023 मध्ये या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. त्याआधी उपासना आई न होण्याच्या निर्णयाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली होती.