
बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान याला ‘राष्ट्रीय पुरस्कार’ मिळाल्यानंतर देशातील प्रत्येक कोपऱ्यातून अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. अनेक सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियावर खास पोस्ट करत किंग खान याला शुभेच्छा दिल्या. फक्त सेलिब्रिटींनीच नाही तर, राजकीय क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी देखील शाहरुख याला शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी देखील अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहे. ज्यावर विनोदी अंदाजात किंग खान याने शशी थरूर यांचे आभार मानले आहेत… सध्या सर्वत्र शशी थरुर यांनी दिलेल्या शुभेच्छांची चर्चा रंगली आहे.
71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये, शाहरुख खानला त्याच्या ब्लॉकबस्टर सिनेमा ‘जवान’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. या सिनेमात शाहरुखने वडील आणि मुलाची दुहेरी भूमिका साकारली होती, ज्याला प्रेक्षक आणि समीक्षकांनी खूप कौतुकास्पद मानले.
सिनेमा ‘जवान’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर शशी थरुर यांनी किंग खान कौतुक करत एक्सवर एक पोस्ट शेअर केली. ‘एका राष्ट्रीय खजिन्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला! अभिनंदन शाहरुख खान…’ सध्या शशी थरूर यांचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शशी थरुर त्यांच्या इंग्रजी भाषेमुळे कायम चर्चेत असतात. पण किंग खान साठी त्यांनी सध्या अंदाजात पोस्ट लिहिली. यावर किंग खान याने विनोदी अंदाजात उत्तर दिलं. ‘सरळ अंदाजात कैतुक केल्यामुळे धन्यवाद… नाही तर, तुमचं भन्नाट इंग्लिश मला समजलं नसतं…’, असं किंग खान म्हणाला. सध्या चाहत्यांमध्ये देखील दोघांच्या ट्विटची चर्चा रंगली आहे.
Thank u for the simple praise Mr Tharoor…
would not have understood something more magniloquent and sesquipedalian… ha ha https://t.co/GHAhyCYT5S— Shah Rukh Khan (@iamsrk) August 3, 2025
राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर शाहरुख खान याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला. अभिनेता म्हणाला, ‘या सन्मानासाठी मी आभारी आहे. गर्वीत आणि विनम्रतेच्या भावना मनात आहेत… मी ज्युरी, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि मला या पुरस्कारासाठी पात्र मानणाऱ्या सर्वांचे आभार मानतो.’ असं किंग खान म्हणाला होता.
‘जवान’ सिनेमाचं दिग्दर्शन एटली याने केलं आहे. सिनेमात शाहरुख आणि अभिनेत्री नयातारा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या सिनेमाची कथा भ्रष्टाचार आणि सामाजिक न्याय यासारख्या गंभीर मुद्द्यांवर आधारित आहे. शाहरुखने एका जेलरची भूमिका साकारली आहे जो महिला कैद्यांच्या टीमसोबत समाजात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील दमदार कमाई केली.