दारू ढोसून मंचावर आल्याचा भाजप मंत्र्याचा आरोप; पहिल्यांदाच दलेर मेहंदी यांनी सोडलं मौन
Daler Mehndi: विशेष म्हणजे, या पोस्टमध्ये त्यांनी उत्तराखंडमधील घटनेवर थेट स्पष्टीकरण देण्याऐवजी आपल्याला मिळालेल्या प्रेमाचा आणि पाठिंब्याचा उल्लेख केला आहे. त्यांच्या या भावनिक पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमधील एका कॉन्सर्टमुळे चर्चेत आहेत. एका सांस्कृतिक कार्यक्रमात उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल यांनी त्यांचा कार्यक्रम मधेच थांबवत जाहीरपणे जाब विचारला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मनोरंजनविश्वातून दलेर मेहंदी यांच्या समर्थनार्थ अनेक कलाकार पुढे आले होते. त्यांचा भाऊ आणि गायक मिका सिंह यानेही त्यांची बाजू मांडली होती. या संपूर्ण प्रकरणावर दलेर मेहंदी यांनी आतापर्यंत मौन बाळगलं होतं. मात्र, आता दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी पहिल्यांदाच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘आपण सगळे एक आहोत’, असं म्हणत त्यांनी चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
नेमकं काय घडलं?
18 ऑक्टोबर रोजी उत्तराखंडमधील टिहरी इथल्या नरेंद्रनगरमध्ये सिद्धपीठ माँ कुंजापुरी पर्यटन आणि विकास मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात दलेर मेहंदी यांचा संगीत कार्यक्रम होता. मात्र, त्यांचं सादरीकरण सुरू असताना उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल थेट स्टेजवर आले आणि त्यांनी गायकाला जाब विचारला. दलेर मेहंदी दारू पिऊन गात असल्याचा आरोप करत मंत्र्यांनी त्यांचा कार्यक्रम थांबवला. तसंच ते व्यवस्थित बोलू शकत नसतील तर गाणार कसे, असा सवालही केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मोठा वाद निर्माण झाला.
दलेर मेहंदी यांची पहिली प्रतिक्रिया
या संपूर्ण वादानंतर दिवाळीच्या निमित्ताने दलेर मेहंदी यांनी इन्स्टाग्रामवर एक खास संदेश शेअर केला. त्यांनी लिहिलं की, गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांनी त्यांच्या संगीतावर आणि प्रत्येक कार्यक्रमावर भरभरून प्रेम केलं आहे. मात्र, अलीकडच्या कठीण प्रसंगात चाहत्यांनी ज्या पद्धतीने त्यांची साथ दिली, त्यांच्यासाठी आवाज उठवला आणि त्यांच्यावर विश्वास दाखवला, त्याला शब्दांत व्यक्त करणं शक्य नाही. चाहत्यांचे मेसेज, त्यांच्या प्रार्थना आणि प्रेम त्यांनी अनुभवले असून, ही साथ ते कधीही विसरणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलं. या पोस्टमध्ये त्यांनी भाऊ मिका सिंहचाही विशेष उल्लेख केला. ‘माझ्या कठीण काळात माझं कुटुंब हीच माझी सर्वात मोठी ताकद ठरलं. माझा भाऊ मिका माझ्यासाठी खंबीरपणे उभा राहिला’, अशा शब्दांत त्यांनी मिकाचे आभार मानले. पत्नी तरन, कुटुंबीय आणि मुलींनी दिलेल्या पाठिंब्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
दलेर मेहंदी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये संगीत आणि मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, चाहते तसंच देशभरातून पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले. प्रेम आणि आदराच्या बंधनाने आपण सगळे जोडले गेलो आहोत, असं सांगताना त्यांनी ‘आपण सगळे एक आहोत’ हा संदेश दिला. प्रत्येक मेसेजला वैयक्तिक उत्तर देता आलं नसलं तरी चाहत्यांचं प्रेम आपण अनुभवलं आहे आणि त्यांची दयाळूपणा कधीही विसरणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.