Nvidiaच्या सीईओच्या चिनी गुप्तहेरासोबतच्या अफेअरमुळे भारताला काय बसू शकतो फटका?
US Tech Company NVIDIA CEO Jensen Huang Affair : जगातील दिग्गज टेक कंपनी एनव्हिडियाच्या सीईओचं जेन्सन हुआंग यांचं चिनी महिला गुप्तहेरासोबत अफेअर असल्याचं समोर येताच रात्रभराच्या ट्रेडिंगमध्ये शेअर्समध्ये घसरण दिसून आली आहे.

जगातील आघाडीची AI चिप बनवणारी कंपनी एनव्हिडिया सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कंपनीचे CEO जेन्सेन हुआंग यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत समोर आलेल्या वृत्तांनंतर कंपनीच्या संचालक मंडळाने चौकशी सुरू केली आहे. चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या एका महिलेसोबत त्यांचे प्रेम संबंध असल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. या बातमीचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. रविवारी रात्री Robinhood च्या ओव्हरनाइट ट्रेडिंगमध्ये Nvidia चा शेअर जवळपास 3.7% घसरला आहे.
सामान्य माणसाला याचा काय फरक पडणार?
आता तुम्हाला प्रश्न पडेल की अमेरिकेतील एका कंपनीच्या CEO च्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींचा आपल्या रोजच्या आयुष्याशी काय संबंध? आपल्यावर याचा काय परिणाम होणार? तर त्याचं उत्तर आहे, AI आणि शेअर बाजार! आज मोबाईल, लॅपटॉप, डेटा सेंटर, ऑनलाइन सेवा आणि अनेक AI टूल्सच्या मागे Nvidia च्या चिप्सचा मोठा वाटा आहे. जगभरातील मोठ्या टेक कंपन्या AI तंत्रज्ञानासाठी Nvidia वर अवलंबून आहेत. त्यामुळे Nvidia च्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली किंवा कंपनीच्या नेतृत्वाबाबत अनिश्चितता निर्माण झाली, तर त्याचा परिणाम टेक क्षेत्रातील गुंतवणूकदारांच्या विश्वासावर होऊ शकतो. याचा अप्रत्यक्ष परिणाम म्युच्युअल फंड, टेक कंपन्यांमधील गुंतवणूक आणि जागतिक शेअर बाजारांवरही होऊ शकतो.
नेमकं प्रकरण काय आहे?
माध्यमात समोर आलेल्या माहितीनुसार,CEO जेन्सेन हुआंग यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एक मेल पाठवला. पाठवलेल्या या अंतर्गत मेलमध्ये त्यांनी आपल्या वैवाहिक आयुष्यातील बेवफाईची कबुली देत माफी मागितली. अर्थात हुआंग यांनी पत्नीची फसवणूक केल्याचं त्यात मान्य केलं आहे. दरम्यान, सिंगापूरची कंपनी मेगास्पीडची एग्जीक्यूटिव ऐलिस हुआंग नावाच्या महिलेबाबत चीनसाठी हेरगिरी केल्याचा संशय व्यक्त करणारी माहिती समोर आली आहे. परंतु हे सगळे आरोप अजून खरे ठरलेले नाहीत. याची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. या धक्कदायक प्रकरणाबद्दल एनव्हिडियाच्या संचालक मंडळाने चौकशी सुरू केली आहे. कंपनीच्या बोर्डाने मात्र राष्ट्रीय सुरक्षेला किंवा कंपनीच्या गोपनीय माहितीला धोका निर्माण झाल्याचा विश्वास ठेवण्याचे कोणतेही कारण नसल्याचे म्हटले आहे.
गुंतवणूकदारांची चिंता का वाढली?
एनव्हिडियाचा शेअर ऑक्टोबरमधील उच्चांकापासून आधीच जवळपास 22% खाली आला आहे. आता CEO संदर्भातील या नव्या वादामुळे गुंतवणूकदारांमध्ये आणखी संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 18 नोव्हेंबर रोजी कंपनी आपले तिमाही आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. कंपनीचा AI व्यवसाय मजबूत राहील अशी आशा असली, तरी CEO संदर्भातील वादामुळे कंपनीच्या कामकाजावर किंवा गुंतवणूकदारांच्या विश्वासावर परिणाम होतो का?, याकडे बाजाराचे लक्ष असेल.
भारतीय गुंतवणूकदारांनी काय समजून घ्यावे?
भारतीय गुंतवणूकदारांनी विशेषतः टेक आणि AI क्षेत्रातील फंडांमध्ये गुंतवणूक केली असेल, तर अशा जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण ही घटना आता गुंतवणूकदारांसाठी नवी चिंता बनला आहे. 18 नोव्हेंबरचे आर्थिक निकाल आणि कंपनीच्या चौकशीतील पुढील घडामोडी याकडे आता संपूर्ण बाजाराचे लक्ष लागले आहे.
