Daler Mehndi: दलेर मेहंदी 2-3 वर्षांपासून ठीक नाहीत, असा अपमान का केला? अनुपम खेर यांनी मंत्र्यांना सुनावलं
दलेर मेहंदी यांच्या परफॉर्मन्सवरून उत्तराखंडच्या मंत्र्यांनी थेट मंचावर जाऊन आक्षेप घेतला. सर्वांसमोर असा अपमान करणं योग्य नसल्याचं म्हणत अनुपम खेर यांनी दलेर मेहंदी यांची बाजू घेतली आहे.

Daler Mehndi: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. आता त्यांनी प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी यांची बाजू घेत उत्तराखंडचे मंत्री सुबोध उनियाल यांच्या वागण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. उत्तराखंडमधील एका सांस्कृतिक कार्यक्रमात दलेर मेहंदी यांना मंत्र्यांनी सर्वांसमोर सुनावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेनंतर मनोरंजनविश्वातून गायकाच्या समर्थनार्थ अनेक कलाकार पुढे आले. आता अनुपम खेर यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया देत एखाद्या कलाकाराच्या सादरीकरणाबाबत तक्रार असली तरी त्याचा सार्वजनिक अपमान करणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
उत्तराखंडमधील टिहरी जिल्ह्यातील नरेंद्रनगर इथं कुंजापुरी मेळ्यादरम्यान दलेर मेहंदी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वादाला सुरुवात झाली. राज्याचे मंत्री सुबोध उनियाल यांनी मंचावर जाऊन गायकाच्या सादरीकरणावर नाराजी व्यक्त केली. दलेर मेहंदी यांना नीट बोलता येत नसताना ते गाणं कसं सादर करणार, असा सवाल त्यांनी केला. तसंच कार्यक्रमासाठी 35 लाख रुपये पैसे खर्च केले असताना प्रेक्षकांचं मनोरंजन होणं अपेक्षित असल्याचंही त्यांनी म्हटलं. मंत्र्यांनी दलेर मेहंदी हे मद्यधुंद असल्याचा आरोप केला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दलेर मेहंदी यांच्या प्रकृतीबाबत आणि कार्यक्रमातील सादरीकरणाबाबत चर्चा सुरू झाली.
पहा व्हिडीओ-
एक-दो दिन पहले एक वीडियो देखा, जिसमें कोई मंत्री जी मंच पर दलेर मेहंदी जी से जिस तरह बात कर रहे थे, उसे देखकर बहुत दुख हुआ। मैं दलेर जी को बहुत सालों से जानता हूँ। यह भी जानता हूँ कि पिछले कुछ समय से उनकी तबीयत ठीक नहीं रही है। मंत्री जी, आपको उनकी प्रस्तुति से शिकायत हो सकती है। नाराज़गी भी हो सकती है। लेकिन सबके सामने मंच पर जाकर इस तरह उन्हें अपमानित करना ज़रूरी था क्या? यही बात उनसे अलग बैठकर, इज़्ज़त से भी तो कही जा सकती थी। एक कलाकार अपनी मेहनत से जो पहचान और सम्मान कमाता है, उसके पीछे पूरी ज़िंदगी लगी होती है। दलेर जी ने पिछले तीस-पैंतीस सालों से अपने गानों से हम सबको ख़ुशी दी है। उस योगदान की कुछ तो क़द्र होनी चाहिए। दलेर जी, मैंने आपको हमेशा एक नेकदिल, प्यार बाँटने वाले इंसान के रूप में जाना है। जहाँ तक मैं आपको जानता हूँ, आप शराब भी नहीं पीते। आपको यह सब सहना पड़ा, इसका मुझे बहुत अफ़सोस है। अपनी इंडस्ट्री के साथियों से भी कहना चाहूँगा—जो लोग दलेर जी को जानते हैं, वे अपनी बात ज़रूर रखें। उनके साथ खड़े हों। किसी के अच्छे स्वभाव के बारे में, उसकी इंसानियत के बारे में अपने अनुभव से दो शब्द कहना भी बहुत मायने रखता है। ऐसे वक़्त में एक साथी के लिए इतना तो हम कर ही सकते हैं। दलेर जी, आप बेहतरीन कलाकार हैं और उतने ही प्यारे इंसान भी। अपना ख़याल रखिए। भगवान आपको अच्छी सेहत दे। मेरा प्यार और सम्मान हमेशा आपके साथ है। 🙏❤️
— Anupam Kher (@AnupamPKher) October 20, 2026
अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ संदेश शेअर करत या घटनेवर नाराजी व्यक्त केली. दलेर मेहंदी यांना आपण गेल्या 20 ते 30 वर्षांपासून ओळखत असल्याचं त्यांनी सांगितलं. माझ्या माहितीनुसार दलेर मेहंदी मद्यपान करत नाहीत आणि ते अत्यंत चांगल्या स्वभावाचे व्यक्ती आहेत, असंही खेर यांनी नमूद केलं. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दलेर मेहंदी यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती आपल्याला एका सामायिक मित्राकडून मिळाल्याचं अनुपम खेर यांनी सांगितलं. प्रकृतीच्या समस्यांनंतरही त्यांनी आयोजकांना दिलेला शब्द पाळण्यासाठी कार्यक्रम केला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
दलेर मेहंदी यांनी कार्यक्रमात लिप-सिंक केलं असण्याची शक्यता अनुपम खेर यांनी नाकारली नाही. मात्र, सादरीकरणाबाबत नाराजी असली तरी कलाकाराशी सर्वांसमोर अशा पद्धतीने बोलणं योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मंत्र्यांना काही तक्रार असल्यास ती खासगीत आणि सन्मानपूर्वक मांडता आली असती, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच, मनोरंजनविश्वातील इतर कलाकारांनीही दलेर मेहंदी यांच्या समर्थनार्थ पुढे यावं, असं आवाहन त्यांनी केलं. कलाकाराने अनेक वर्षांच्या मेहनतीतून मिळवलेल्या प्रतिष्ठेचा आदर केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
या प्रकरणात गायक मिका सिंह, रॅपर बादशाह आणि अभिनेता-कॉमेडियन कपिल शर्मा यांच्यासह अनेक कलाकारांनी दलेर मेहंदी यांना पाठिंबा दिला आहे. मिका सिंहने आपल्या भावाच्या प्रकृतीचा संदर्भ देत त्यांच्यावरील आरोपांना विरोध केला.
