गर्लफ्रेंडसोबत दिसला पती; निखिल पटेलविरोधात दलजीतने उचललं मोठं पाऊल

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरच्या वैवाहिक आयुष्यात गेल्या काही महिन्यांपासून समस्या सुरू आहेत. दलजीतने गेल्या वर्षी मार्च महिन्यात केन्यातील बिझनेसमन निखिल पटेलशी तिने दुसरं लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या दहा महिन्यांतच ती पतीला सोडून भारतात परतली.

गर्लफ्रेंडसोबत दिसला पती; निखिल पटेलविरोधात दलजीतने उचललं मोठं पाऊल
दलजीत कौर, निखिल पटेल
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 04, 2024 | 2:43 PM

‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दलजीत कौर तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. दलजीतने 2023 मध्ये केन्यातील बिझनेसमन निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं होतं. लग्नानंतर ती मुलाला घेऊन पतीसोबत केन्याला राहायला गेली होती. मात्र लग्नाच्या आठ महिन्यांतच ती मुलाला घेऊन केन्यातून भारतात परतली. त्यानंतर सोशल मीडियावर विविध पोस्ट लिहित तिने पतीवर विवाहबाह्य संबंधाचे आरोप केले. तर दुसरीकडे निखिलनेही दलजीतसोबतच्या लग्नाला मान्यता देण्यास नकार दिला. आता याप्रकरणी तिने थेट निखिलवर फसवणुकीचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे.

नुकताच निखिल त्याच्या कथित गर्लफ्रेंडसोबत मुंबईत आला होता. यावेळी पापाराझींसमोर दोघांनी फोटोसाठी पोझसुद्धा दिले होते. यावरून दलजीतनेही सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केलं होतं. आता ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या माहितीनुसार, दलजीतने निखिलविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यात तिने असा दावा केला आहे की जेव्हा ती केन्याला गेली होती, तेव्हा निखिलने तिच्या मुलासोबत चुकीचा व्यवहार केला होता. मुलाच्या प्रत्येक छोट्या चुकीबद्दल निखिल त्याच्यावर ओरडायचा आणि यामुळेच मुलगा जेडन त्याला घाबरत होता, असं तिने म्हटलंय. या रिपोर्टमध्ये असंही म्हटलंय की दलजीत जेव्हा भारतात परतली तेव्हा निखिलने त्याच्या कथित गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला होता. जेव्ह दलजीतने त्याला याविषयी विचारलं, तेव्हा त्याने अफेअर असल्याचं नाकारलं होतं.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत निखिल म्हणाला होता, “यावर्षी जानेवारी महिन्यात दलजीतने मुलाला घेऊन भारतात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही तिथेच विभक्त झालो. आमच्या या मिश्र कुटुंबाचा पाया तितका मजबूत बनू शकला नाही जितकी आम्हाला अपेक्षा होती. दलजीतला केन्यामध्ये राहायला जमत नव्हतं.”

दलजीत जेव्हा मुलासह भारतात परतली, तेव्हा निखिलने तिला नोटीस बजावून केन्यातील घरातून सर्व सामान नेण्यास सांगितलं होतं. अन्यथा ते सामान तिथल्या स्वयंसेवी संस्थेत दान करण्याचाही इशारा दिला होता. निखिलसोबत लग्न करण्यापूर्वी दलजीतने अभिनेता शालीन भनोटशी लग्न केलं होतं. जेडन हा दलजीत आणि शालीन यांचाच मुलगा आहे. लग्नाच्या काही वर्षांनंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी दलजीतने शालीनवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता.