
कुवैतमध्ये अडकलेल्या मुलाला सुरक्षित भारतात आणण्यासाठी मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदारने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भावूक विनंती केली. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. यामुळे विशाखा सुभेदारचा मुलगा तिथे अडकला आहे. विशाखाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत त्यात तिच्या मुलाविषयी चिंता व्यक्त केली होती. या व्हिडीओमध्ये विशाखाला अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचं आश्वासन दिलं आहे.
विशाखा सुभेदारने तिच्या इन्स्टाग्रामवर एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते फोनद्वारे विशाखाशी संवाद साधताना दिसत आहेत. “तुमच्या मुलाशी बोलणं झालं आहे. त्याला जी काही अडचण आहे, ते आमचे दुबईतले महाराष्ट्र मंडळाचे पैठणकर म्हणून आहेत, ते कुवेतमधल्या आपल्या लोकांशी संपर्क साधत आहेत. त्याला इथे सुरक्षित आणण्यात येईल, तोपर्यंत हॉटेलमध्ये त्याची राहण्याची व्यवस्था वगैरे आम्ही इथून करतो. तुम्ही काळजी करू नका. विमानसेवा पूर्ववत होताच त्याला मुंबईत सुखरुप आणू,” असं आश्वासन शिंदेंनी दिलं आहे.
विशाखाचा मुलगा अभिनय हा लंडनहून परत भारतात येत होता, परंतु कुवैतमध्ये असताना त्याची फ्लाइट रद्द करण्यात आली. गेल्या चार दिवसांपासून तो एअरलाइनने सुविधा दिलेल्या हॉटेलमध्ये राहत आहे. परंतु त्या प्रदेशातील भीषण परिस्थितीमुळे तो घरी परतू शकत नाहीये. ‘कृपया मला मदत करा. माझा मुलगा अभिनय हा कुवैतमध्ये अडकला आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंना मदतीसाठी आवाहन करते’, असं कॅप्शन लिहित तिने व्हिडीओ पोस्ट केला होता.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ले केल्यानंतर मध्य पूर्वेतील तणाव वाढला आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला इस्रायलने हल्ला केला, त्यानंतर अमेरिकन तळांवर प्रॉक्सी हल्ले झाले. अमेरिका आणि इस्रायलनेही इराण समर्थित गटांवर हल्ले करत प्रत्युत्तर दिलं. यामुळे संपूर्ण प्रदेशातील विमान सेवा विस्कळीत झाल्या आहेत. सोनल चौहार आणि ईशा गुप्ता यांसारखे सेलिब्रिटीसुद्धा दुबईत अडकले होते.