मुंबईत झाडांची कत्तल पाहून ढसाढसा रडली ‘DDLJ’मधली छुटकी; बीएमसीवर अभिनेत्रीचा संताप, नेटकरीही चिडले

'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' फेम छुटकी अर्थात अभिनेत्री पूजा रूपारेल मुंबईतील वृक्षतोडीविरोधात आक्रमक झाली आहे. झाडांची कत्तल पाहून तिला अश्रू अनावर झाले असून, झाडांना मिठी मारून ती ढसाढसा रडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबईत झाडांची कत्तल पाहून ढसाढसा रडली DDLJमधली छुटकी; बीएमसीवर अभिनेत्रीचा संताप, नेटकरीही चिडले
अभिनेत्री पूजा रुपारेल
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 20, 2026 | 11:41 AM

Pooja Ruparel Video: शाहरुख खान आणि काजोल यांच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (DDLJ) या सुपरहिट चित्रपटात छुटकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा रूपारेल सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मुंबईतील झाडांची कत्तल पाहून अभिनेत्रीला अश्रू अनावर झाले आहेत. झाडांना मिठी मारून ती ढसाढसा रडताना दिसत आहे. एवढंच नाही तर या प्रकरणावरून तिचा पोलिसांशीही वाद झाल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अभिनेत्रीचा संताप पाहून नेटकरीही प्रतिक्रिया देत आहेत.

मुंबईतील झाडांची कत्तल पाहून अभिनेत्री भावूक

मुंबईतील वर्सोवा परिसरातील नाना-नानी पार्कमध्ये सध्या झाडे तोडण्याचं काम सुरू आहे. वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोड प्रकल्पासाठी इंटरचेंज उभारण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) या परिसरातील हिरवळ हटवली जात आहे. 18 नोव्हेंबरपासून झाडांची कत्तल सुरू झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी त्याला विरोध केला आहे. अभिनेत्री पूजा रूपारेल हिनेही या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पूजाने सोशल मीडियावर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये ती झाडं तोडली जात असल्याचं पाहून भावूक झालेली दिसते. एका जुन्या वडाच्या झाडाला हेरिटेज ट्री म्हणजेच वारसा वृक्ष संबोधत तिने प्रशासनाला जाब विचारला आहे. हे झाड तोडण्याचा अधिकार कोणाला दिला? हा आमचा वृक्ष आहे, तो तोडण्याचा त्यांना अधिकार नाही, हे बेकायदेशीर आहे, अशा शब्दांत तिने संताप व्यक्त केला.

Loading...

पहा व्हिडीओ

‘इन्होंने हमारे पूर्वज को चीरा है…’

दुसऱ्या व्हिडीओमध्ये पूजा तोडलेल्या झाडांना मिठी मारून रडताना दिसते. झाडांवर असलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांचं आणि त्यांच्या अन्नाचं काय होणार, असा सवाल तिने उपस्थित केला आहे. झाडांवर पक्षी आणि इतर जीव अवलंबून असतात. झाड तोडल्यामुळे केवळ एका वृक्षाचं नुकसान होत नाही, तर अनेक जीवांचं संपूर्ण घर उद्ध्वस्त होतं, असं ती सांगते. ‘इन्होंने हमारे पूर्वज को चीरा है’, असं म्हणत तिने आपली नाराजी व्यक्त केली. संबंधित झाड 35 वर्षांचं असल्याचा दावा केला जात असल्यावरही तिने प्रश्न उपस्थित केले आहेत.

पोलिसांनी अभिनेत्रीला नेलं पोलीस ठाण्यात

या संपूर्ण प्रकारादरम्यान पोलिसही घटनास्थळी पोहोचले. व्हिडीओमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पूजाला तिथून निघण्यास सांगितल्याचं दिसतं. त्यानंतर तिला तिथून घेऊन जाताना ती विरोध करताना दिसते. ‘हे लोक मला घेऊन जात आहेत’, असं ती व्हिडीओमध्ये सांगते. पहिल्यांदाच आपण पोलीस ठाण्यात जात असून एका चांगल्या कामासाठी आवाज उठवल्यामुळे ही वेळ आल्याचंही ती म्हणते.

दीया मिर्झा, रिचा चड्ढाचाही विरोध

या वृक्षतोडीविरोधात अभिनेत्री दीया मिर्झा आणि रिचा चड्ढा यांनीही आवाज उठवला आहे. दीया मिर्झाने झाडांच्या कत्तलीबद्दल दुःख व्यक्त करत ‘Our hearts have been ripped apart’ अशी प्रतिक्रिया दिली. तर रिचा चड्ढानेही मुंबईतील हिरवळ नष्ट करण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, बीएमसीने या प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या आणि ट्री अथॉरिटीची मंजुरी असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे विकासकाम आणि पर्यावरण संवर्धन यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us