
रोमँटिक कॉमेडी हा एक असा जॉनर आहे जो प्रत्येक सिनेप्रेमींचा लोकप्रिय असतो. हलक्या-फुलक्या कॉमेडीसह रोमँटिक कथा आणि ड्रामा पहायला अनेकांना आवडतं. असाच एक चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाला आहे. ओटीटी येताच हा चित्रपट नंबर 1 वर ट्रेंड होतोय. हा एक असा चित्रपट आहे, ज्यामध्ये प्रेक्षकांना प्रेम, ड्रामा, कॉमेडी आणि थोडंफार कटकारस्थान असं सर्वकाही पहायला मिळणार आहे. यात एका अशा तरुणीची कथा दाखवण्यात आली आहे जी, तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या पुरुषाच्या प्रेमात पडते. जेव्हा ती तिच्या प्रियकराची भेट आई-वडिलांशी करून देते, तेव्हा त्यांना आश्चर्याचा मोठा धक्काच बसतो. आपल्या वडिलांच्या वयाच्या पुरुषाशी ती लग्न करणार असल्याची गोष्टच त्यांना पचत नाही. त्यानंतर ते हळूच मुलीला दुसऱ्या तरुणाच्या प्रेमात पाडण्याचा प्लॅन करतात. यासाठी ते त्यांच्या मुलीच्या आयुष्यात तिसऱ्या मुलाला घेऊन येतात.
नायिका तिच्या आई-वडिलांच्या पसंतीनुसार लग्न करते की स्वत:चं प्रेम मिळवते, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण चित्रपट पहावा लागेल. वडील-मुलीचं भांडण, प्रेमासाठी त्याग आणि त्यात तिसरा व्यक्ती आल्यानंतर काय होतं, या सर्वांचा तडका असलेली ही रंजक कथा प्रेक्षकांना या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘दे दे प्यार दे 2’. हा चित्रपट 14 नोव्हेंबर 2025 रोजी देशभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 9 जानेवारी 2026 रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाला. तेव्हापासून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दे दे प्यार दे’चा हा सीक्वेल आहे.
‘दे दे प्यार दे 2’ या चित्रपटात अजय देवगण, रकुल प्रीत सिंह, आर. माधवन, जावेद जाफरी, गौतमी कपूर आणि मिझान जाफरी यांच्या भूमिका आहेत. अंशुल शर्माने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून लव रंजनने याची कथा लिहिली आहे. या चित्रपटाने जगभरात 111 ते 112 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर भारतात 74 कोटी रुपयांची कमाई झाली.