चाकणकरांच्या मानहानीच्या दाव्यातील हवाच निघणार?; दीपाली सय्यद यांच्या नव्या दाव्याने खळबळ

रूपाली चाकणकर यांनी दीपाली सय्यद यांच्यावर २५ कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. फक्त दीपालींवरच नव्हे तर महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स सिनेमाशी संबंधीत अनेक लोकांवर करण्यात आल्याचे म्हटले आहे.

चाकणकरांच्या मानहानीच्या दाव्यातील हवाच निघणार?; दीपाली सय्यद यांच्या नव्या दाव्याने खळबळ
Deepali Sayyad
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 08, 2026 | 5:58 PM

काही दिवसांपूर्वी नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांनी राज्यात खळबळ माजली आहे. त्याचे खासगी आयुष्य आणि राजकीय व्यक्तींसोबत असलेले संबंध समोर आले होते. दरम्यान महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबतचा देखील एक फोटो व्हायरल झाला होता. आता अशोक खरातच्या आयुष्यावर महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स नावाचा सिनेमा येत आहे. या सिनेमामध्ये रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत अभिनेत्री दीपाली सय्यद दिसणार आहेत. मात्र, याबाबत माहिती मिळताच रुपाली चाकणकर यांनी दीपाली सय्यदला नोटीस बजावली. आता दीपाली सय्यदने रूपाली चाकणकर यांच्या २५ कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

रूपाली चाकणकर यांनी दीपाली सय्यद यांच्यावर २५ कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. फक्त दीपालींवरच नव्हे तर अनेक लोकांवर असे दावे करण्यात आल्याचे दीपाली यांनी सांगितले. या प्रकरणात त्यांनी कोर्टात उत्तर दाखल करत रूपाली चाकणकर यांच्या आरोपांना स्पष्ट उत्तर दिले आहे.

दीपाली म्हणाल्या काय?

“त्यांना असं वाटतं की मी त्यांच्या नावाचा वापर करून त्यांचे व्यक्तिमहत्त्व खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. पण चित्रपटात जे आहे ते आहे, जे नाही ते मी कधीही बोलले नाही. मी कोर्टात योग्य त्या पद्धतीने उत्तर देत आहे,” असे दीपाली सय्यद यांनी स्पष्ट केले. दीपाली यांचे म्हणणं आहे की सिनेमात चाकणकरांची मानहानी होईल असं काहीच नाहीये. रूपाली चाकणकर यांनी केवळ दीपालींनाच नव्हे तर चित्रपटाशी संबंधित सर्व लोकांना आणि अनेक चॅनेल्सना नोटीस पाठवल्याचेही दीपाली यांनी सांगितले. “अंजलीताई, सुषमा अंधारे, रूपाली ठोंबरे यांच्यासह एकूण ४० लोकांची यादी आहे,” असे त्यांनी नमूद केले.

चित्रपट थांबणार नाही

रूपाली चाकणकर यांच्या नोटिशी आणि दाव्यांमुळे चित्रपट थांबणार नसल्याचे दीपाली यांनी ठामपणे सांगितले. “शूटिंग सुरू आहे. ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. २ ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होणारच,” असे त्यांनी जाहीर केले. दीपाली पुढे म्हणाल्या, “मी जर पदावर असते तर त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा दिली असती. आम्ही कोणाचीही बदनामी करत नाही.”

हिंदुस्तानी भाऊ आणि शिवसेनेवर भाष्य

हिंदुस्तानी भाऊबाबत बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या, “सगळे आता लाईनमध्ये आले आहेत. शिंदे साहेबांचे नेतृत्व सर्वांना आवडते. ते सर्वांचे बोलणे ऐकून घेतात. त्यांच्यासमोर कोणाचीही झोली खाली पडत नाही.”

Follow Us