‘डर्टी पीआर गेम्स’च्या आरोपांवर दीपिकाचं दिग्दर्शकाला सडेतोड उत्तर; माझ्या निर्णयावर..

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'स्पिरीट' या चित्रपटातून अभिनेत्री दीपिका पादुकोणने अचानक माघार घेतली. त्यानंतर संदीपने सोशल मीडियावर पोस्ट लिहित तीव्र संताप व्यक्त केला होता. त्याने अप्रत्यक्षपणे दीपिकावर जोरदार टीकासुद्धा केली होती. त्यानंतर आता दीपिका काय म्हणाली, ते पहा..

डर्टी पीआर गेम्सच्या आरोपांवर दीपिकाचं दिग्दर्शकाला सडेतोड उत्तर; माझ्या निर्णयावर..
Deepika Padukone
Image Credit source: Instagram
| Updated on: May 28, 2025 | 1:34 PM

‘स्पिरीट’ या चित्रपटावरून सध्या अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यात शाब्दिक वाद सुरू आहे. दीपिकाने अचानक या चित्रपटातून माघार घेतल्यानंतर संदीपने सोशल मीडियावर पोस्ट लिहित राग व्यक्त केला होता. संदीपने दीपिकावर घाणेरडे पीआर खेळ खेळल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता एका कार्यक्रमातील दीपिकाच्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलंय. दीपिकानेही अप्रत्यक्षपणे संदीपला सडेतोड उत्तर दिल्याचं म्हटलं जात आहे. नुकतीच ती मुंबईतील एका कार्यक्रमात अत्यंत ग्लॅमरस अंदाजात पोहोचली होती. या कार्यक्रमात तिला तिच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील आव्हानांना सामोरं जाण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

या प्रश्नाचं उत्तर देताना दीपिका म्हणाली, “मला वाटतं की मला संतुलित ठेवणारी गोष्ट म्हणजे फक्त खरं असणं आणि प्रामाणिक वागणं. जेव्हा जेव्हा मी कठीण परिस्थिती किंवा कठीण आव्हानांना तोंड देते, तेव्हा मला वाटतं की माझ्या अंतर्मनाचा आवाज ऐकणं, निर्णय घेण्यास सक्षम असणं आणि त्या निर्णयांवर टिकून राहणं यामुळे मला खरोखर खूप शांती मिळते. तेव्हाच मला सर्वांत जास्त आरामदायी वाटतं” ‘स्पिरीट’ चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दीपिकाचं हे वक्तव्य खूप व्हायरल होत आहे. दीपिकाने थेट संदीपचं नाव घेतलं नसलं तरी ते त्याच्या आरोपांनाच हे उत्तर दिल्याचं म्हटलं जात आहे.

संदीपने काय म्हटलं होतं?

‘जेव्हा मी एखाद्या कलाकाराला चित्रपटाची कथा सांगतो, तेव्हा त्याच्यावर मी 100 टक्के विश्वास ठेवतो. आमच्यात चित्रपटाची कथा इतर कोणासमोरही उघड न करण्याचा अलिखित करार असतो. पण असं करून तू स्वत: कशी व्यक्ती आहे, याचा खुलासा केला आहेस. तरुण अभिनेत्रीला कमी लेखणं आणि माझी कथा इतरांना सांगणं.. तुझ्या स्त्रीवादाचा अर्थ हाच आहे का? एक दिग्दर्शक म्हणून माझ्या कलेमागे अनेक वर्षांची मेहनत असते आणि माझ्यासाठी दिग्दर्शनच सर्वस्व आहे. तुला ते समजलं नाही. तुला ते कधी समजणारही नाही. एक काम कर.. पुढच्या वेळेस संपूर्ण कथाच सांगून टाक. कारण मला फरक पडत नाही. मला ही म्हण खूप आवडते, खुंदक में बिल्ली खंबा नोचे’, अशी टीका त्याने दीपिकाचं नाव न घेता तिच्यावर केली होती.

‘स्पिरीट’मधून दीपिकाने माघार घेतल्यानंतर त्यात अभिनेत्री तृप्ती डिमरीची एण्ट्री झाली. तृप्तीने याआधी संदीपच्या ‘ॲनिमल’मध्ये काम केलं होतं. आता ‘स्पिरीट’मध्ये ती साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत रोमान्स करताना दिसणार आहे.