Deepika Padukone: दीपिका पादुकोणला अनुपम खेर यांनी मारायला लावला होता झाडू; ॲक्टिंग क्लासमध्येच डोळ्यांत आले अश्रू
अभिनेत्री दीपिका पादुकोणसंदर्भात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी IFFI 2026 मध्ये रंजक किस्सा सांगितला. अभिनयाच्या स्कूलमध्ये झाडू मारण्याचा साधा सीन साकारतानाही तिला अडचण आली होती, असं त्यांनी सांगितलं.

Deepika Padukone: बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. मात्र, अभिनेत्री होण्यापूर्वी दीपिकालाही अभिनयाचे धडे गिरवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी नुकताच दीपिकाच्या एक्टिंग स्कूलमधील दिवसांचा एक रंजक किस्सा सांगितला आहे. एका साध्या झाडू मारण्याच्या सीनसाठी दीपिकाला प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. इतकंच नाही, तर हा सीन करता करता तिच्या डोळ्यांत अश्रू आले होते. अनुपम खेर यांनी गोव्यातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI 2026) मधील एका चर्चासत्रात हा किस्सा सांगितला.
दीपिका अनुपम खेर यांच्या एक्टिंग स्कूलची विद्यार्थिनी
दीपिका पादुकोणने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी मॉडेलिंग क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली होती. फराह खानने तिला शाहरुख खानसोबत ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात काम करण्याची संधी दिली होती. मात्र, चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी दीपिकाने अभिनयाचं प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने मुंबईतील अनुपम खेर यांच्या ‘एक्टर प्रिपेअर्स’ या एक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. तिथे तिने तीन महिन्यांचा अभिनयाचा कोर्स पूर्ण केला होता.
अनुपम खेर यांनी सांगितलं की, दीपिका त्यांच्या एक्टिंग स्कूलच्या दुसऱ्या बॅचची विद्यार्थिनी होती. ती त्यावेळी प्रसिद्ध मॉडेल होती. तिचं व्यक्तिमत्त्व अतिशय शिस्तबद्ध आणि नीटनेटकं होतं. चहाचा कप उचलतानाही तिच्या हालचालींमध्ये एक प्रकारचा एलिगन्स दिसायचा. मात्र, अभिनय करताना प्रत्येक गोष्ट इतकी व्यवस्थित करून चालत नाही. पात्राच्या स्वभावानुसार वागणंही तितकंच महत्त्वाचं असतं, असं अनुपम यांना वाटत होतं.
झाडू मारण्याचा सीन करताना दीपिका झाली होती निराश
अनुपम खेर यांनी पुढे सांगितलं की, एकदा त्यांनी दीपिकाला घरकाम करणाऱ्या महिलेची भूमिका साकारण्यास सांगितलं. या भूमिकेत तिला फक्त जमिनीवर झाडू मारायचा होता. मात्र, दीपिका हा सीनदेखील तिच्या नेहमीच्या आकर्षक अंदाजात करत होती. त्यामुळे अभिनयात हवा तसा नैसर्गिकपणा दिसत नव्हता. त्यानंतर अनुपम यांनी त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेला वर्गात बोलावलं आणि तिला झाडू मारून दाखवण्यास सांगितलं. त्या महिलेने अतिशय सहजपणे आणि नैसर्गिक पद्धतीने झाडू मारला. त्यानंतर अनुपम यांनी दीपिकाला जोपर्यंत तिचा अभिनय खरा वाटत नाही, तोपर्यंत हा सराव सुरू ठेवावा लागेल, असं सांगितलं.
डोळ्यांत आले होते अश्रू, पण दीपिकाने हार मानली नाही
हा सराव करताना दीपिका सुरुवातीला खूप वैतागली होती. तिला जवळपास रडूच कोसळणार होतं. मात्र, तिने हार मानली नाही आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न करून अखेर तो सीन योग्य पद्धतीने साकारला. विशेष म्हणजे, हा सराव पूर्ण झाल्यानंतर दीपिकाने अनुपम खेर यांचे आभारही मानले.