“मी काय विचार करत होते?” दीपिकाला आजही होतो त्या गोष्टींचा पश्चात्ताप
अभिनेत्री दीपिका पादुकोणने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भूतकाळातील काही निवडींवर पश्चात्ताप व्यक्त केला. त्यावेळी मी काय विचार करत होते, असा प्रश्न तिने स्वत:लाच विचारला आहे. दीपिकाला बॉलिवूडमध्ये जवळपास 18 वर्षे पूर्ण झाली आहेत.

अभिनेत्री दीपिका पादुकोणने ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. गेल्या 18 वर्षांच्या करिअरमध्ये दीपिकाने सर्वांत यशस्वी अभिनेत्री म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. परंतु काही वेळा दीपिकाला अपयशालाही सामोरं जावं लागलं. तिच्या काही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करता आलं नाही. तर काही चित्रपटांवर समीक्षकांनी टीका केली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिका यावर मोकळेपणे व्यक्त झाली. भूतकाळातील चित्रपटांच्या निवडीचा विचार केला तर काही बाबतीत पश्चात्ताप होत असल्याची कबुली दीपिकाने या मुलाखतीत दिली.
‘हार्पर बझार इंडिया’ला दिलेल्या मुलाखीत दीपिका म्हणाली, “फक्त एकच गोष्ट ज्यावर चर्चा करता येत नाही ती म्हणजे प्रामाणिकता. जी गोष्ट मला खरी वाटत नाही ती मी कधीच करत नाही. कधीकधी लोक बदल्यात खूप पैसे देतात आणि त्यांना वाटतं की ते पुरेसं आहे, पण ते पुरेसं नाही. याउलटही गोष्ट खरी आहे. काही गोष्टी व्यावसायिकदृष्ट्या मोठ्या नसील, पण मी तेव्हा लोकांवर किंवा त्यातून दिल्या जाणाऱ्या संदेशावर विश्वास ठेवते. त्यावर मात्र मी ठाम राहीन.”
यावेळी दीपिकाने अशीही कबुली दिली की तिच्या विचारांमध्ये अशी स्पष्टता नेहमीच नव्हती. “मी नेहमीच इतकी स्पष्ट होते का? कदाचित नसेलही. पण आता मी ती स्पष्टता गाठली आहे. मी कधीकधी मागे वळून विचार करते की, तेव्हा मी नेमका काय विचार करत होते? अर्थात, हा शिकण्याचा एक भाग आहे. कदाचित दहा वर्षांनंतर मी आजच्याही काही निवडींवर प्रश्न उपस्थित करेन. पण सध्यातरी त्या निवडी प्रामाणिक वाटत आहेत”, असं दीपिका पुढे म्हणाली.
View this post on Instagram
दीपिकाच्या हातात सध्या दोन प्रोजेक्ट्स आहेत. शाहरुख खानच्या आगामी ‘किंग’ या चित्रपटात ती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात सुहाना खान, अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्याही भूमिका आहेत. एप्रिल 2026 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर दीपिका दिग्दर्शक अटलीच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती पहिल्यांदाच साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत काम करणार आहे. या चित्रपटाचं नाव सध्या AA22xA6 असं ठेवण्यात आलं आहे. नंतर ते बदलण्याची शक्यता आहे. हा चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
