Pravin Tarde : ‘देऊळ बंद 2’ सिनेमाने 100 कोटींचा टप्पा गाठला पण कसा? फक्त थिएटर मधूनच कमाई झाली नाही तर…
Pravin Tarde : 'देऊळ बंद 2' सिनेमाची कमाई वाढावी म्हणून प्रवीण तरडे यांनी नेमकं काय केलं? लढवली मोठी शक्कल, म्हणाले, '.... नाहीतर, 100 कोटी शक्य झालेच नसते.', मुलाखतीत प्रवीण तरडे यांचा मोठा खुलासा...

Pravin Tarde : अभिनेता ‘राजा शिवाजी’ सिनेमानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळ बंद 2’ सिनेमाने इतिहास रचला आणि सिनेमा 100 कोटींच्या घरात पोहोचला. पण 100 कोटींपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. यासाठी प्रवीण तरडे आणि सिनेमाच्या टीमने प्रचंड मेहनत घेतली. सिनेमाची कमाई फक्त थिएटरमधून झाली नाही तर, अन्य ठिकाणी वेगळी शक्कल लढवून ‘देऊळ बंद 2’ सिनेमाने कमाई केली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत प्रवीण तरडे म्हणाल, ‘सिनेमाने 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला, पण त्याचं सर्वात मोठं गुपित काय आहे माहितीये? तर ते गुपित आहे नवीन आयडिया…’
‘फक्त बॉक्स ऑफिसवर अवलंबून राहायचं नाही, असं आम्ही ठरवलं आणि निर्मात्यांसोबत निर्णय घेतले… थिएटर मधून तर पैसा येतोच पण आम्ही तंबू थिएटर चालवले. 100 कोटींच्या मागचं हे सर्वात मोठं सत्य आहे. ‘देऊळ बंद 2’ सिनेमाची कमाई 88 ते 90 कोटींच्या पुढे गेलीच नसती. पण ज्या भागात थिएटर नाही, त्या भागात आम्ही 25, 30, 40 रुपयांमध्ये स्वामींच्या केंद्रात जाऊन शो दाखवले.
‘त्यानंतर तंबू थिएटरमध्ये शो केले. तंबू शोमधून सव्वाचार कोटींचं कलेक्शन केलं. दुसरी आयडीया म्हणजे, संपूर्ण जगभरातील महाराष्ट्र मंडळांसोबत आम्ही संपर्क केला. त्यासाठी एक माणूस नेमला. परदेशात देखील जवळपास सव्वा दोनशे शो केले. परदेशात शो हाऊस फुल झाला तर, पाच लाख रुपयांपर्यंत कमाई पोहोचायची.’
पुढे प्रवीण तरडे म्हणाले, ‘अमेरिकेत आम्ही 54-55 शो केले. जर्मनी, कॅनडा, जपान, सिंगापूर, नेदरलँड, दुबईमध्ये शो केले. परदेशात पावणे आठ कोटी कलेक्शन झालं. सांगायचं झालं तर आम्ही फक्त बॉक्स ऑफिसवर अवलंबून राहिलो नाही. आम्हे वेगळ्या वाटा देखील निवडल्या.
दोन वर्ष मी सिनेमासाठी दिली आणि सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर 50 दिवस मी घरात थांबलो नाही. रोज थिएटरमध्ये जाऊन लोकांसोबत संवाद साधला.. उन्हातान्हांत, पावसात फिरलो… मुंबईत रात्रीचे शो हाऊसफूल व्हायचे. त्या शोला देखील मी गेलो, लोकांना भेटलो. प्रत्येक प्रेक्षकाला मी फोटो दिला आहे. हे 100 कोटी अचानक आलेले नाहीत…’ असं देखील प्रवीण तरडे एका मुलाखतीत म्हणाले आहेत.