Deool Band 2 : ‘देऊळ बंद 2’ सिनेमाची अफाट कमाई नेमक्या कोणत्या कामासाठी वापरणार? निर्मात्यांची मोठी घोषणा
Deool Band 2 : 'देऊळ बंद 2' सिनेमाची चर्चा सध्या सर्वत्र तुफान रंगत आहे. मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यापासून सिनेमा आफाट कमाई करताना दिसत आहे. तर सिनेमाच्या कमाईचा मोठा भाग कोणत्या कामासाठी वापरणार, यावर निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे.

Deool Band 2 : श्रद्धा, अंधश्रद्धा, नास्तिकता आणि शेतकरी संघर्षा भोवती फिरणारा ‘देऊळ बंद 2’ सिनेमा 21 मे 2016 रोजी प्रदर्शित झाला आणि श्री स्वामी समर्थांची अद्भुत लीला प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता आल्या. सांगायचं झालं तर, सिनेमा प्रदर्शित होऊन आता दोन आठवडे झाले आहे. पण सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील कमाईची पकड काही सैल झालेली नाही. आजही सिनेमा बक्कळ कमाई करताना दिसत आहे. रिपोर्टनुसार, आतापर्यंत सिनेमाने 75 कोटींचा टप्पा गाठला आहे. तर येत्या दिवसांत सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे, सिनेमाच्या कमाईतून जो नफा होईल, त्याबद्दल देखील निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. हे पैसे शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार असल्याची घोषणा सिनेमाच्या निर्मात्यांनी केली आहे.
दरम्यान, जळगावमध्ये ‘देऊळ बंद 2’ सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि निर्माते कैलास वाणी यांच्या उपस्थितीत पीव्हीआर आयनॉक्स सिनेमागृहात विशेष शोचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रवीण तरडे यांनी पीव्हीआर आयनॉक्स सिनेमागृहात प्रेक्षकांसोबत मनमोकळा संवाद साधला. यावेळी चित्रपटगृहातील प्रेक्षकांसोबत दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सेल्फी व्हिडिओ कॉल केल्याचं देखील पाहायला मिळालं.
‘माझा चित्रपट शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायला मदत करेल… असा आशावाद दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी व्यक्त केला. प्रवीण तरडे म्हणाले, ‘सामाजिक विषयांवर सिनेमे करु. आपल्यावर समाजाचं देणं आहे आणि ते फेडण्याचा प्रयत्न मी करत आहे. आयुष्य आहे म्हटल्यानंतर प्रत्येक वेळी वेगवेगळी अव्हाने समोर येतात. त्या अव्हानांना तोंड देत पुढे जाण्याचं काम प्रत्येकाचं आहे… उद्याची सकाळ मस्तच आहे… असा विचार करून नव्या दिवसाची सुरवात करायची… असं म्हणत प्रवीण तरडे यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका… असं आवाहन देखील यावेळी केलं.
यावेळी त्यांनी सिनेमाच्या कमाईतून मिळालेल्या नफ्याबद्दल देखील मोठी घोषणा केली. सिनेमाचे निर्माते कैलास वाणी यांनी सिनेमातून मिळालेला कोट्यावधी रुपयांचा नफा हा शेतकऱ्यांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी दिला.. सांगायचं झालं तर, अवघ्या दहा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने चांगलं यश मिळवलं आहे.