धर्मेंद्र यांच्या निधनानंतर जुहू इथल्या बंगल्याबाबत सनी-बॉबी देओलचा मोठा निर्णय

बॉलिवूडचे 'ही-मॅन' म्हणून ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या जवळपास दीड महिन्यानंतर सनी आणि बॉबी देओल यांनी जुहू इथल्या बंगल्याबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून या बंगल्याच्या परिसरात बांधकामाची साहित्ये पहायला मिळत आहेत.

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर जुहू इथल्या बंगल्याबाबत सनी-बॉबी देओलचा मोठा निर्णय
धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 18, 2026 | 2:15 PM

बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं नोव्हेंबर 2025 मध्ये निधन झालं. मुंबईतल्या जुहू इथल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देओल कुटुंबीयांच्या या घराला ‘धर्मेंद्र हाऊस’ असं म्हटलं जातं. आता वडिलांच्या निधनानंतर सनी आणि बॉबी देओल या दोघांनी मिळून बंगल्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रिअल इस्टेट प्लॅटफॉर्म नो ब्रोकरने दिलेल्या माहितीनुसार, या बंगल्याची किंमत तब्बल 60 कोटी रुपये इतकी आहे. आता जुहू इथला हा ‘धर्मेंद्र हाऊस’ आणखी मोठा होणार आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सनी आणि बॉबी देओलने या बंगल्याचे मजले वाढवण्याचा निर्णय घेतला असून बांधकामाला सुरुवात झाली आहे.

विक्की लालवानीने दिलेल्या वृत्तानुसार, धर्मेंद्र यांच्या जुहू इथल्या बंगल्यावर आणखी एक मजला बांधण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या बंगल्यात बरीच हालचाल सुरू आहे. नुकतंच बंगल्याच्या परिसरात क्रेनसुद्धा दिसली आणि छतावर जोरात काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सनी आणि बॉबी देओल एकत्रितपणे बंगल्यावर नवीन मजला बांधत आहेत. मुलं मोठी होत आहेत, त्यांना अधिक जागेची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया देओल कुटुंबीयांच्या जवळच्या व्यक्तीने दिली. बांधकामाचं हे काम पुढील किमान चार ते पाच महिने किंवा त्याहूनही जास्त वेळ चालू राहू शकतं.

‘धर्मेंद्र हाऊस’मध्ये देओल कुटुंब एकत्र राहतात. बॉबी देओल, त्याची पत्नी तान्या देओल आणि आर्यमान, धरम या दोन्ही मुलांसोबत याच बंगल्यात राहतो. तर सनी देओलसुद्धा त्याची पत्नी पूजा देओल आणि दोन्ही मुलं करण, राजवीरसोबत इथेच राहतो. याशिवाय दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर, त्यांची बहीण आणि भाचीसुद्धा याच घरात संयुक्त कुटुंब म्हणून राहतात.

‘धर्मेंद्र हाऊस’ हे अत्यंत मोठं आणि आलिशान घर आहे. या घराच्या इंटेरिअरमध्ये आधुनिक आणि पारंपरिक डिझाइनचं मिश्रण पहायला मिळतं. ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत, बॉबी देओलने सांगितलं होतं की घरातील काही भागाचं इंटेरिअर डिझाइन पत्नी तान्या देओलने केलं आहे. तान्या ही स्वत: इंटेरिअर डिझायनर आहे.