
बॉलिवूडचा “ही-मॅन” हा अखेर काळाच्या पडद्याआड गेला आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झालं. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांचे कुटुंबिय विलेपार्ले स्मशानभूमीवर पोहोचले असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांचे शेवटे दर्शन घेण्यासाठी अनेक कलाकार देखील स्मशानभूमीत पोहोचत आहेत. धर्मेंद्र यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तब्बल एका वर्षात 70 पेक्षाही जास्त हीट चित्रपट देण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे आणि आतापर्यंत हा रेकॉर्ड कोणीही मोडू शकलं नाही. पण हे फार कमी जणांना माहित असेल की धर्मेंद्र यांना ‘ही-मॅन’ असं का म्हटलं जायचं? तसेच त्यांना हे नाव कसं काय मिळालं? हे जाणून घेऊयात.
धर्मेंद्र यांचे सुरुवातीचे आयुष्य संघर्षांनी भरलेले होते
“ही-मॅन” धर्मेंद्र यांचे सुरुवातीचे आयुष्य संघर्षांनी भरलेले होते. गॅरेजमध्ये काम करण्यापासून ते स्टारडमपर्यंतच्या त्यांचा प्रवास सोपा नव्हता. धर्मेंद्र यांनी लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले. मजबूत शरीरयष्टी, दमदार अॅक्शन आणि त्यांचा देखणेपणा यानं सर्वांचेच हृदय जिंकलं. पण चित्रपटांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी धर्मेंद्र यांचा प्रवास संघर्षांनी भरलेला होता.
चित्रपटांपूर्वी धर्मेंद्र यांनी सुरुवातीला एका गॅरेज आणि ड्रिलिंग फर्ममध्ये काम केले
पंजाबमधील लुधियाना येथील एका छोट्या गावात जन्मलेल्या धर्मेंद्र यांचा चित्रपटांशी काहीही संबंध नव्हता. पण लहानपणापासूनच त्यांना चित्रपटांची आवड होती. एकदा त्यांनी सुरैयाचा “दिल्लगी” हा चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेता बनण्याचा निर्णय घेतला. मुंबईत आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला एका गॅरेज आणि ड्रिलिंग फर्ममध्ये काम केले. त्यावेळी त्यांचा पगार फक्त 200 रुपये होता, ज्यामुळे त्यांना उदरनिर्वाह करणे खूप कठीण झाले. त्यांना ओव्हरटाईम देखील करावा लागला. पण या संघर्षामुळे त्यांना आत्मविश्वास मिळाला आणि त्यांचे स्वप्न जिवंत राहिले.
धर्मेंद्र बॉलिवूडमध्ये कसे आले?
धर्मेंद्र यांचा पहिला चित्रपट, “दिल भी तेरा मैं भी तेरा”, 1960 मध्ये आला. या चित्रपटातून त्यांच्या चित्रपट प्रवासाची सुरुवात झाली. सुरुवातीला ते त्यांच्या पहिल्या काही चित्रपटांमध्ये रोमँटिक हिरो म्हणून दिसले, परंतु त्यानंतर “शोला और शबनम” सारख्या चित्रपटांनी त्यांना ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही.
धर्मेंद्र यांना ‘ही-मॅन’ ही पदवी कशी मिळाली?
धर्मेंद्र यांचे खरे स्टारडम 1966 मध्ये आलेल्या “फूल और पत्थर” या चित्रपटापासून सुरु झाले. या चित्रपटात त्यांनी शर्टलेस अॅक्शन सीक्वेन्स सादर केले ज्यामुळे बॉलीवूडमध्ये एक नवीन ट्रेंड सुरू झाला. त्यांच्या शक्तिशाली शरीरयष्टी आणि उत्साही शैलीमुळे त्यांना “ही-मॅन ऑफ बॉलीवूड” ही पदवी मिळाली. त्यानंतरच्या “मेरा गाव मेरा देश,” “धरम वीर,” “आग ही आग,” आणि “शोले” सारख्या चित्रपटांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा अॅक्शन स्टार म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं
51 रुपयांपासून कोटींपर्यंतचा प्रवास
धर्मेंद्र यांना त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी फक्त 51 रुपये मानधन मिळाले होते हे फार कमी लोकांना माहिती आहे, पण आज त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 335 कोटी आहे. दरम्यान धर्मेंद्र हे एका चित्रपटासाठी अंदाजे 5 ते 10 कोटी मानधन घेत असायचे असं म्हटलं जायचं.