Dharmendra : धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा; मुलगी ईशा देओलने दिली मोठी अपडेट

Dharmendra : 89 वर्षीय धर्मेंद्र यांना गेल्या काही दिवसांपासून अनेकदा नियमित तपासणी आणि उपचारासाठी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आलं. सोमवारी दुपारपासून त्यांची तब्येत नाजूक होती. आता मुलगी ईशा देओलने त्यांच्या तब्येतीविषयी महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे.

Dharmendra : धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा; मुलगी ईशा देओलने दिली मोठी अपडेट
धर्मेंद्र
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 11, 2025 | 9:43 AM

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असून ते बरे होत असल्याची मोठी अपडेट त्यांची मुलगी ईशा देओलने दिली आहे. सोमवारी दुपारपासून त्यांची तब्येत नाजूक असल्याचं म्हटलं जात होतं. मंगळवारी सकाळपासूनच त्यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. या अफवांच्या पार्श्वभूमीवर अखेर ईशा देओलने स्पष्टीकरण दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात ते आपला 90 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. सोमवारी दुपारपासून ते व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती होती. हेमा मालिनी, सनी देओल आणि मुलगी इशा देओल हे धर्मेंद्र यांच्याबरोबर रुग्णालयात असल्याचं कळतंय. देओल कुटुंबीयांच्या खासगीपणाचा आदर करावा, असं आवाहन त्यांच्या माहिती जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

ईशा देओलची पोस्ट-

‘मीडिया अतिरेक करत असल्याचं दिसतंय आणि चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर असून ते बरे होत आहेत. आम्ही सर्वांना विनंती करतो की आमच्या कौटुंबिक खासगीपणाचा आदर करावा. वडिलांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते,’ अशी पोस्ट ईशा देओलने लिहिली आहे.

श्वसनाच्या त्रासामुळे धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र गेल्या सहा दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. त्यांचा ‘इक्किस’ हा चित्रपट येत्या 25 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. 2012 मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘यादों की बारात’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘नौकर बीवी का’, ‘फूल और पत्थर’, ‘पत्थर’ आणि ‘घायल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.

पंजाबमधील लुधियाना इथल्या एका गावात धर्मेंदर केवल कृष्ण देओल यांचा जन्म झाला होता. त्यांनी 1954 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतत प्रवेश केला. नंतर विवाहित असतानाच धर्मेंद्र हे अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं.

वयाच्या 89 व्या वर्षीही ते चित्रपटसृष्टीत आणि सोशल मीडियावर सक्रिय आहेत. ते अनेकदा निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणारे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करतात. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ते ट्रॅक्टर चालवताना, शेती करताना आणि चाहत्यांना आयुष्याचे धडे देताना विविध व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करतात.