धर्मेंद्र यांच्यापासून वेगळं राहण्याबाबत हेमा मालिनी यांनी सोडलं मौन; म्हणाल्या..
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र ही एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी होती. आजही ही जोडी अनेकांचं लक्ष वेधून घेते. नुकताच या दोघांनी आपल्या लग्नाचा 44 वा वाढदिवस साजरा केला.
अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. त्यांच्या लग्नाला 43 वर्षे पूर्ण झाली आहेत. हेमा मालिनी यांच्याशी लग्न करताना धर्मेंद्र हे विवाहित होते. तरीसुद्धा त्यांनी हेमा यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दुसऱ्या लग्नानंतरही त्यांनी पहिली पत्नी प्रकाश कौर यांना कधीच सोडलं नाही. असं असूनही या दोघांच्या नात्यात आजही भरपूर प्रेम असल्याचं पहायला मिळतं. आज एकीकडे धर्मेंद्र हे त्यांच्या पहिल्या पत्नी आणि मुलांसोबत राहतात. तर दुसरीकडे हेमा या वेगळ्या राहतात. एका जुन्या मुलाखतीत हेमा मालिनी या त्यांच्या लग्नाविषयी आणि परिस्थितीविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या होत्या.
“आपल्या पतीपासून दूर किंवा वेगळं राहायला कोणत्याच पत्नीला आवडत नाही पण काही परिस्थितींमुळे असं करावं लागतं. तुम्हाला अशी परिस्थिती स्विकारावी लागते. प्रत्येक महिलेला तिच्या पती आणि मुलांसोबत एकाच कुटुंबात एकत्र राहायला आवडतं. पण माझ्याबाबतीत काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने घडल्या”, असं हेमा म्हणाल्या होत्या. असं असूनही आयुष्यात समाधानी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. “मला याबद्दल वाईट वाटत नाही किंवा मी रडत बसले नाही. मी माझ्यासोबत खुश आहे. माझ्या दोन मुली आहेत आणि त्यांना मी खूप चांगल्या पद्धतीने मोठं केलंय. अर्थात ते माझ्यासोबत होते, प्रत्येकवेळी आणि प्रत्येक ठिकाणी”, असं त्या पुढे म्हणाल्या. धर्मेंद्र हे वडील म्हणूनही खूप चांगले आहेत. त्यांना त्यांच्या मुलींच्या भवितव्याची खूप चिंता असायची असं हेमा यांनी सांगितलं.
View this post on Instagram
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी काही दिवसांपूर्वीच लग्नाचा 44 वा वाढदिवस साजरा केला. या दोघांची पहिली भेट 1970 मध्ये ‘तुम हसीन मैं जवान’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. हेमा यांच्या घरातून लग्नाला विरोध असतानाही दोघंही आपल्या निर्णयावर ठाम होते. 1980 मध्ये धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं.
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या जोडीकडे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. हेमा मालिनी यांची आई जया चक्रवर्ती आणि वडील व्ही. एस. रामानुजन चक्रवर्ती यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतच्या लग्नाला स्पष्ट नकार दिला होता. कारण त्यावेळी धर्मेंद्र आधीच प्रकाश कौर यांच्याशी विवाहित होते. धर्मेंद्र यांच्यापासून हेमा मालिनी यांना दूर करण्यासाठी तिच्या वडिलांनी बरेच प्रयत्न केले होते.