‘धुरंधर 2’च्या टीमवर होणार मोठी कारवाई; आदित्य धरचा स्टुडिओ थेट ब्लॅकलिस्टमध्ये?

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर 2' हा चित्रपट येत्या 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी हा चित्रपट अडचणीत सापडला आहे. शूटिंगदरम्यान सतत नियम मोडल्याने मुंबई महानगरपालिका चित्रपटाच्या टीमवर नाराज झाली आहे.

धुरंधर 2च्या टीमवर होणार मोठी कारवाई; आदित्य धरचा स्टुडिओ थेट ब्लॅकलिस्टमध्ये?
Ranveer Singh in Dhurandhar
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 17, 2026 | 2:11 PM

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या चित्रपटाने कमाईचे नवीन विक्रम रचले. आता या चित्रपटाच्या सीक्वेलची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ‘धुरंधर 2’ हा दुसरा भाग येत्या 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. परंतु त्यापूर्वीच या सीक्वेलवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. धुरंधरचे निर्माते आणि मुंबई महानगरपालिका यांच्यातील हा वाद आहे. या वादामागचं कारण म्हणजे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान टीमकडून मोडण्यात आलेले नियम. ‘धुरंधर 2’च्या शूटिंगदरम्यान टीमने अनेकदा नियम मोडल्याचा आरोप मनपाने केला आहे. प्रॉडक्शन कंपनीविरोधात मनपाने अनेक आरोप केले आहेत.

सेटवर जेवण बनवण्यासाठी गॅसचा वापर करणं, जिथे परवानगी नव्हती, तिथेच शूटिंग करणं, असे आरोप मनपाने प्रॉडक्शन टीमवर केले आहेत. याप्रकरणी BMC च्या A वॉर्ड कार्यालयाने मनपा उपायुक्तांना पत्र लिहून दिग्दर्शक आदित्य धरची प्रॉडक्शन कंपनी B62 Studios ला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. ‘धुरंधर 2’च्या शूटिंगदरम्यान वारंवार सुरक्षा आणि नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शूटिंगदरम्यान उच्च सुरक्षा क्षेत्रात ज्वलंत मशाली वापरण्यात आल्या होत्या. ही अत्यंत गंभीर सुरक्षा चूक मानली गेली. यात मुंबई पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनी घटनास्थळावरील उपकरणं जप्त केली. इतकंच नव्हे तर चित्रपटाच्या क्रू मेंबर्सनी परवानगीशिवाय शूटिंगचं ठिकाण बदललं आणि महानगरपालिकेकडून आवश्यक परवानगी न घेता इमारतीच्या टेरेसचा वापर केला. त्याचसोबत स्थानिक प्रशासनाकडून वैध परवानगी न घेता सेटवर दोन जनरेटर व्हॅनदेखील कार्यरत होत्या.

याप्रकरणी महानगरपालिकेनं उपायुक्तांना औपचारिक पत्र पाठवत राज्याच्या सिंगल-विंडो फिल्मिंग पोर्टलद्वारे स्टुडिओवर शूटिंग करण्यापासून कायमचं बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला आहे. याच कारवाईचा एक भाग म्हणून महापालिकेनं आधीच 25 हजार रुपयांची सुरक्षा ठेव जप्त केली असून 1 लाख रुपयांचा अतिरिक्त दंड आकारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अद्याप आदित्य धरच्या स्टुडिओला अधिकृतपणे ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आलेलं नाही.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये रणवीरसोबतच संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि राकेश बेदी यांच्याही भूमिका आहेत.