
बॉक्स ऑफिसवर सध्या रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या धुरंधर चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल खास क्रेझ दिसून आली आहे. हा चित्रपट पाहून आलेले प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रेमात पडले आहेत. अक्षय खन्नाच्या भूमिकेच भरभरुन कौतुक सुरु आहे. बहरीनच्या एका रॅपरने गायलेल्या गाण्यावर अक्षय खन्नाचा चित्रपटात डान्स आहे. तो तुफान हिट झालाय. लोक त्यावरुन स्वत:चे रिल्स बनवत आहेत. हा स्पाय थ्रिलर चित्रपट असला, तरी नेहमीच्या स्पाय पठडीतला हा चित्रपट नाहीय. गँगवॉरच्या माध्यमातून हेरगिरीचं विश्व दाखवलं आहे. हे दिग्दर्शक आदित्य धरचं कौशल्य आहे. त्यात तो यशस्वी झालाय. सिनेरसिकांना तिकीट बारीवर खेचून आणण्यात तो यशस्वी ठरला आहे. स्टोरी हे सुद्धा चित्रपटाच्या यशाचं एक कारण आहे.
धुरंधरमध्ये पाकिस्तानमधील कराचीच्या ल्यारी शहराचं गँगवॉर दाखवण्यात आलं आहे. पाकिस्तानातील पोलीस यंत्रणा आणि तिथल्या गुन्हेगारी विश्वाच चित्रीकरण या चित्रपटातून मांडण्यात आलं आहे. फिल्ममध्ये अक्षय खन्ना, संजय दत्त, रणवीर सिंह आणि अर्जुन रामपाल हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात कराचीच्या ल्यारीच जे गँगवॉर दाखवलय प्रत्यक्षात ते ल्यारी शहर कसं आहे? तिथे गँगस्टर्स कसे काम करायचे? तिथे गुन्हेगारीची सुरुवात कशी झाली? आता तिथे काय स्थिती आहे? या बद्दल जाणून घ्या.
ल्यारी कुठे आहे? आणि का खास आहे?
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कराची शहरात ल्यारी नावाचा भाग आहे. 6 स्कॉयर किमीमध्ये ल्यारी पसरलेलं आहे. ल्यारी जुनं शहर आणि कराची बंदरापासून खूप जवळ आहे. 2023 सालच्या जनगणनेनुसार ल्यारीमध्ये 10 लाख लोकसंख्या राहते. कराचीच्या घनदाट वस्ती असलेल्या भागांपैकी हा एक भाग आहे. ल्यारीमध्ये बलूच, सिंधी, उर्दू, पश्तून आणि पंजाबी भाषा बोलणारे लोक राहतात. ल्यारी नदीच्या किनाऱ्याजवळ हा भाग आहे. नदीचा उगम कराचीच्या उत्तर पूर्वेला होतो. ही नदी शहराच्या अंतर्गत भागातून वाहते.
हा भाग गुन्हेगारीचा अड्डा कसा बनला?
80 आणि 90 च्या दशकात कराचीमध्ये गुन्हेगारी वाढू लागली. हळू-हळू ल्यारीच्या अरुंद गल्ल्या गँगस्टर्सनी व्यापल्या. कमी शिक्षण, गरिबी, बरोजगारी आणि सरकारी दुर्लक्षामुळे गुन्हेगारी वाढली. अनेक गँग्सनी या भागात आपलं नेटवर्क उभं केलं. यात सर्वात मोठं नाव रेहमान डकैत, उजैर बलोच, अर्शद पप्पू, आणि बाबा लाडला होतं.
गँग्सना राजकीय संरक्षण कसं मिळालं?
पाकिस्तान पीपुल्स पार्टी (PPP) दीर्घकाळापासून ल्यारीमधील लोकप्रिय पक्ष आहे. व्होट बँक पॉलिटिक्ससाठी अनेकदा गुन्हेगारांना राजकीय संरक्षण मिळतं. त्या बदल्यात गँगस्टर्स PPP ची मत अन्य पक्षांकडे वळणार नाहीत याची काळजी घेतात.
अरुंद गल्ल्यांमध्ये पोलिसांसाठी ऑपरेशन करणं कठीण होतं. गँग्सकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र असायची. अनेक भागात पोलीस जायचा घाबरायचे. गँग्स मेडिकल कॅम्प लावून इथे अथलेटिक इवेंट आणि गरीबांना मदत अशी काम करायचे. त्यामुळे या गुंडगिरीला जनाश्रय मिळाला.
रेहमान डकैत कोण होता?
चित्रपटात अक्षय खन्नाने रहमान डकैतशी साधर्म्य असलेली भूमिका साकारली आहे. रहमान डकैतच खरं नाव सरदार अब्दुल रहमान बलोच होतं. त्याने 1990 च्या दशकात शस्त्रास्त्र, ड्रग्स तस्करी आणि पैसे उकळणे या माध्यमातून साम्राज्य उभं केलं. त्याच्याबद्दल अनेक किस्से फेमस आहेत. त्याने रागात आपल्या आईची हत्या केलेली. पण हे सिद्धच कधी झालं नाही. 2000 च्या सुरुवातीला रहमानने ल्यारीमध्ये ड्रग तस्करी, जबरदस्तीची वसुली आणि जुगाराच्या रॅकेटवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं.
ल्यारीमध्ये 300 ते 500 गँगस्टर्स सक्रीय होते. संपूर्ण क्राइमच नेटवर्क 100 ते 1500 लोकांमध्ये पसरलेलं आहे. रहमान डकैत गुन्हे करायचा पण तो फुटबॉल मॅच ठेवायचा. गरीबांना मदत करायचा. मशिदी आणि शाळांसाठी पैसे द्यायचा. छोटे-मोठे प्रॉब्लेम सोडवायचा. म्हणून ल्यारीच्या लोकांसाठी तो हिरो होता.
गँगच राजकीय स्वरुप
रहमान डकैतने नंतर पीपुल्स अमन कमेटी (PAC) नावाचा पक्ष बनवला. ही गँग आणि राजकीय संघटनेच मिश्रण होतं. PAC चा ल्यारीवर पूर्ण कंट्रोल होता.
पीपुल्स अमन कमेटी PAC काय काम करायची?
टॅक्सप्रमाणे पैसे वसूल करायची?
ल्यारीमध्ये कोण व्यवसाय करणार? कोण घर बनवणार? याचा निर्णय करायचे.
ड्रग्स आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीवर नियंत्रण होतं.
पाण्याचे टँकर आणि पाइपलाइनवर कब्जा करायचे.
गँगस्टर्स कसे ऑपरेट करायचे ?
पावती सिस्टिम
कोणाला घर बनावयाचय, दुकान उघडायचय, लग्न करायचं आहे, तो PAC कडून पावती फाडावी लागायची. पावती शिवाय कुठलही काम व्हायचं नाही.
पाण्यावर नियंत्रण
कराचीमध्ये पाण्याची कमतरता असते. PAC ने पाण्याची पाइपलाइन आणि टँकर माफियावर नियंत्रण ठेवलं होतं. पाणी महागड्या किंमतीला विकायचे. हा त्यांचा मोठा बिझनेस होता.
जबरदस्ती वसुली
प्रत्येक दुकानदार, ट्रान्सपोर्टर, कंपनीकडून पैशांची वसुली व्हायची. पैसे दिले नाहीत, तर धमकी मिळायची. गँगस्टर्स लोकांची मदतही करायचे. जेणेकरुन लोक विरोधात जाऊ नयेत.
ड्रग आणि शस्त्रास्त्रांची तस्करी
अफगाणिस्तानातून येणारे ड्रग्स आणि शस्त्रांचा मोठा हिस्सा ल्यारीमधून जायचा.
चौधरी अस्लम यांची भूमिका
कराची पोलीस दलातील साहसी अधिकारी SP चौधरी असलम हे ल्यारी गँग्सचे सर्वात मोठे शत्रू मानले जायचे. त्यांनी छोट्या-मोठ्या गँगस्टर्स विरोधात अनेक ऑपरेशन्स चालवली. PAC ला संपवण्याचा प्रयत्न केला. रहमान डकैतचं नेटवर्क तोडण्यासाठी अभियान चालवलं. 9 ऑगस्ट 2009 रोजी कराचीच्या स्टील टाऊनमध्ये एका पोलीस एन्काऊंटरमधून रहमान डकैतचा खात्मा झाला. या ऑपरेशनच नेतृत्व चौधरी अस्लमने केलं. चित्रपटात संजय दत्तने चौधरी अस्लमची भूमिका साकारली आहे.
काय होतं ऑपरेशन ल्यारी?
2012 साली सरकारने ल्यारीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑपरेशन चालवलं. हजारो पोलीस कर्मचारी आणि चिलखती गाड्या पाठवल्या. गँग्सनी RPG रॉकेट लॉन्चरद्वारे हल्ले केले. अनेक दिवस फायरिंग आणि स्फोटाचे आवाज येत होते. अनेक नागरिकही मारले गेले. ऑपरेशन ल्यारी पूर्णपणे यशस्वी झालं नाही. पण PAC ची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली.
आताचं ल्यारी कसं आहे?
धुरंधर चित्रपटात ल्यारीला जसं दाखवलय तसं ते आज नाहीय. आता परिस्थिती बदलली आहे. गँगस्टर्स नेटवर्क मोठ्या प्रमाणात कमकुवत झालं आहे. इथे लोक मान्य करतात की, ल्यारीची जी जुनी ओळख आहे, त्यामुळे तरुणाईच नुकसान झालं. पण युवक आता रोजगाराला प्राधान्य देतात.
ल्यारीला पाकिस्तानातील मिनी ब्राझीलही म्हणतात. सध्या ल्यारीमध्ये 4 फुटबॉल ट्रेनिंग अकादमी आहेत. यात मुली सुद्धा खेळतात. ल्यारीमधल्या मुला-मुलींनी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केलय.