Dhurandhar : रणवीरच्या ‘धुरंधर’ला मोठा फटका; मोफत एचडी प्रिंट डाऊनलोड करून बघतायत चित्रपट

रणवीर सिंहच्या 'धुरंधर' या चित्रपटाला मोठा फटका बसला आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या काही तासांतच हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. असंख्य लोक हा चित्रपट मोफत डाऊनलोड करून मोबाइलमध्ये बघत आहेत.

Dhurandhar : रणवीरच्या धुरंधरला मोठा फटका; मोफत एचडी प्रिंट डाऊनलोड करून बघतायत चित्रपट
रणवीर सिंह
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 10, 2025 | 3:48 PM

आदित्य धर दिग्दर्शित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘धुरंधर’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. गेल्या पाच दिवसांत या चित्रपटाने कमाईचा 150 कोटींचा टप्पा पार केला आहे. सोशल मीडियावरही सध्या याच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे निर्माते या यशाचा आनंद साजरा करत असतानाच आता दुसरीकडे त्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. कारण प्रदर्शनाच्या अवघ्या आठवडाभरात हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. असंख्य लोक हा चित्रपट मोफत डाऊनलोड करून एचडी प्रिंटमध्ये बघत आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या कमाईला मोठा फटका बसतोय.

रणवीर सिंह, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्याच्या काही तासांनंतरच ‘धुरंधर’ ऑनलाइन लीक झाला. तेव्हापासून असंख्य लोक या चित्रपटाला मोफत डाऊनलोड करून पाहत आहेत. रणवीर सिंहचा हा चित्रपट ‘जिला’, ‘मूव्ही रुल्ज’, ‘तमिळ रॉकर्स’ आणि ‘टेलीग्राम’ यांसारख्या अनेक पायरेटेड वेबसाइट्सवर 240p पासून 1080p फुल एचडी क्वालिटीमध्ये डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या काही वर्षांपासून डिजिटल पायरसीविरोधात सरकारकडून कडक नियम आणि कायदे आखले जात असतानाही अशा पद्धतीने अनेक चित्रपट ऑनलाइन लीक होत आहेत. पायरसीमुळे अनेक चित्रपटांना मोठा फटका बसला आहे. याविरोधात अनेक निर्माते-दिग्दर्शक आणि कलाकारांनी आवाज उठवला आहे. परंतु त्याला पूर्णपणे आळा बसला नाही, हे धुरंधरच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. याआधी अनेक पायरेटेड वेबसाइट्सवर कारवाई करण्यात आली, तर अनेक बेकायदेशीर वेबसाइट्स ब्लॉक करण्यात आले. तरीसुद्धा नव्याने त्यांचे लिंक्स तयार होताना दिसतात.

‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धरने ‘धुरंधर’चं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट देशभरातील तब्बल पाच हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. उत्तम कथानक, दिग्दर्शन आणि कलाकारांचं दमदार अभिनय याच्या जोरावर ‘धुरंधर’ने प्रेक्षक-समिक्षकांची मनं जिंकली आहेत. ओपनिंग वीकेंडलाच कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार करून या चित्रपटाने हे सिद्ध केलंय की येत्या काही दिवसांत तो बॉक्स ऑफिसवर अक्षरश: वादळ आणणार आहे.