सोनाक्षीने खाल्ला बीफ बर्गर? पती झहीर स्पष्टच म्हणाला..

झहीर इक्बालने पत्नी सोनाक्षी सिन्हाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती बर्गर खाताना दिसतेय. यावरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केला. ती बीफ बर्गर खातेय, असा दावाही नेटकऱ्यांनी केला आहे. त्यावर झहीरने उत्तर दिलंय.

सोनाक्षीने खाल्ला बीफ बर्गर? पती झहीर स्पष्टच म्हणाला..
Sonakshi Sinha and Zaheer Iqbal
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 04, 2025 | 10:33 AM

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे बॉलिवूडमधील सर्वांत चर्चेतल्या जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांची केमिस्ट्री अनेकांना आवडत असली तरी काही लोक असेही आहेत जे त्यांना सतत लक्ष्य करतात. अशीच काहीशी घटना नुकतीच घडली आहे. सोनाक्षीच्या वाढदिवसानिमित्त झहीरने इन्स्टाग्रामवर तिचा मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने त्याच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये सोनाक्षी बर्गर खाताना दिसतेय. परंतु ती बीफ बर्गर खात असल्याचा दावा एका युजरने केला असता त्यावर झहीरने सडेतोड उत्तर दिलं आहे.

झहीरने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये सोनाक्षी बर्गरचा पुरेपर आस्वाद घेताना दिसत आहे. ‘माझ्या जानला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. अशा क्षणांसाठी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू नेहमीच खूश राहा आणि तुझं पोट कायम भरलेलं असू दे. तुला असं नाचताना पाहण्यासाठी मी तुला जेवायला घेऊन जातो. तुझ्या चेहऱ्यावर जेवण लागलंय हे न सांगण्यासाठी मी कायम तुझ्यासोबत असेन’, अशी मजेशीर पोस्ट त्याने लिहिली आहे. त्याचसोबत सोनाक्षीने बर्गर खाल्ल्याच्या दोन तासांनंतर तिला लग्नासाठी प्रपोज केल्याचा खुलासा झहीरने केला. 30 डिसेंबर 2022 ची ही घटना आहे. सोनाक्षीच्या बोटात अंगठी नसताना तिने जेवलेलं हे शेवटचं जेवण आहे, असंही त्याने म्हटलंय.

या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी ही जोडी खूपच मजामस्ती करणारी वाटली, तर काहींना त्यांची केमिस्ट्री, त्यांच्यातील मैत्री खूप आवडली. परंतु काहींनी सोनाक्षीच्या बर्गरवरून प्रश्न उपस्थित केला. ती बीफ खातेय का, असा सवाल एकाने केला. तर ‘ती नक्कीच बीफ बर्गर खातेय’ असं दुसऱ्याने म्हटलंय. या कमेंट्सवर झहीरने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिलं, ‘काळजी करू नका, हा व्हेज (शाकाहारी) बर्गर आहे.’

सोनाक्षी आणि झहीरने गेल्या वर्षी जून महिन्यात लग्न केलं. नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर त्यांनी भव्य रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. सोनाक्षीला या आंतरधर्मीय लग्नावरून बरंच ट्रोलसुद्धा करण्यात आलं होतं. याबद्दल सोनाक्षी एका मुलाखतीत म्हणाली होती, “झहीर आणि मी धर्माकडे पाहतच नाही. आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो आणि आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं होतं. मग लग्न करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय काय होता? तो त्याचा धर्म माझ्यावर थोपत नव्हता किंवा मी माझा धर्म त्याच्यावर थोपत नाही. आमच्यात याबद्दल संवादच झाला नाही. आम्ही कधी बसून यावर बोललोच नाही.”