हृतिक-जॉनचा शाळेच्या दिवसांमधील फोटो व्हायरल; चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

अभिनेता हृतिक रोशन आणि जॉन अब्राहम यांचा शाळेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. हृतिक आणि जॉनने एकत्र काम करावं, अशी इच्छा काहींनी व्यक्त केली आहे.

हृतिक-जॉनचा शाळेच्या दिवसांमधील फोटो व्हायरल; चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
हृतिक रोशन, जॉन अब्राहम
Image Credit source: Instagram
| Updated on: May 08, 2024 | 4:19 PM

‘धूम’ या चित्रपटाच्या फ्रँचाइजीमध्ये अभिनेता हृतिक रोशन आणि जॉन अब्राहम यांनी भूमिका साकारल्या आहेत. मात्र या दोघांनी आजवर एकत्र काम केलं नाही. हृतिक आणि जॉन यांनी एकत्र स्क्रीन शेअर केला नसला तरी शाळेत असताना दोघं एकाच फोटोमध्ये झळकले होते. बॉम्बे स्कॉटिश स्कूलचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये हृतिक आणि जॉन एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. या फोटोमध्ये वरून दुसऱ्या रांगेत डावीकडे बसलेला मुलगा हृतिक आहे. तर हृतिकच्या खालच्या रांगेत डावीकडे उभा असलेला मुलगा जॉन आहे. हे दोघं शाळेत एकाच वर्गात शिकत होते. या फोटोवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

‘या दोघांना एकाच चित्रपटात एकाच फ्रेममध्ये बघायला आवडेल’, असं एकाने म्हटलंय. तर ‘हृतिक आणि जॉन बॅचमेट्स होते’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे. ‘जिम आणि कबीर शाळेत असताना असे दिसायचे,’ असंही एका युजरने म्हटलं आहे. हृतिक आणि जॉनने आजवर एकत्र काम केलं नसलं तरी यश राज फिल्म्सच्या दोन सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या संजय गढवीच्या ‘धूम’ या चित्रपटात जॉनने कबीर ही खलनायकी भूमिका साकारली होती. त्यानंतर 2006 मध्ये हृतिक ‘धूम 2’मध्ये आर्यन या खलनायकी भूमिकेत झळकला होता. दोघांचा शाळेतील फोटो पाहून त्यांना एकाच चित्रपटात पाहण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली.

2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘वॉर’ या सुपरस्पाय चित्रपटात हृतिकने कबीरची भूमिका साकारली होती. यशराज फिल्म्सनेच या चित्रपटाची निर्मिती केली होती. याच बॅनरअंतर्गत ‘पठाण’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये जॉनने जिमची भूमिका साकारली होती. हृतिक लवकरच ‘वॉर 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय त्याच्या ‘क्रिश 4’ या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे जॉन हा निखिल अडवाणीच्या ‘वेदा’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.