“जितकं मी इस्लामला समजू शकले..”; मुस्लीम अभिनेत्याशी लग्न केलेल्या दीपिकाचं पहलगाम हल्ल्यावर वक्तव्य

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर अभिनेत्री दीपिका कक्करने प्रतिक्रिया दिली आहे. ज्यादिवशी हल्ला झाला, त्याचदिवशी दीपिका आणि तिचा पती शोएब श्रीनगरहून दिल्लीला परतले होते. दिल्लीला पोहोचताच त्यांना पहलगाम हल्ल्याची माहिती मिळाली होती.

जितकं मी इस्लामला समजू शकले..; मुस्लीम अभिनेत्याशी लग्न केलेल्या दीपिकाचं पहलगाम हल्ल्यावर वक्तव्य
Dipika Kakkar on Pahalgam attack
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 29, 2025 | 10:08 AM

टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर आणि तिचा पती शोएब इब्राहिम नुकतेच काश्मीरला फिरायला गेले होते. ज्यादिवशी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, त्याचदिवशी ते श्रीनगरहून दिल्लीला परतले होते. आता एका व्लॉगद्वारे दीपिकाने पहलगाम हल्ल्यावर दु:ख व्यक्त केलंय. दीपिकाने शोएबशी आंतरधर्मीय लग्न केलंय. लग्नांतर इस्लाम धर्माविषयी जे शिकायला किंवा समजायला मिळालं, त्यावरून असा हल्ला प्रामाणिक मुस्लीम करूच शकत नाही, असं तिने म्हटलंय. “गेल्या दोन-तीन दिवसांपासून एक वेगळ्याच प्रकारची निराशा जाणवतेय. विचार करण्याची किंवा समजण्याची क्षमता संपलेली असते, तसं वाटू लागलंय”, असं दीपिका म्हणाली.

पहलगाम हल्ल्याविषयी भावना व्यक्त करत ती पुढे म्हणाली, “या घटनेनं सर्वांनाच पूर्णपणे हादरवून टाकलं आहे. या हल्ल्याविषयीचे जे व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर पहायला मिळतायत, ते पाहून माझं मन खूप दुखावतंय. घटनेच्या काही तासापूर्वी आम्ही काश्मीरमध्येच होतो. परंतु आम्ही बैसरन व्हॅलीला भेट दिली नव्हती. आपल्या कुटुंबीयांसोबत, प्रिय व्यक्तीसोबत फिरायला आलेल्यांना अशा धक्कादायक घटनेचा सामना करावं लागणं हे प्रचंड वेदनादायी आहे. या घटनेनं माझं हृदय पिळवटून निघालं आहे.”

“त्या पर्यटकांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असेल. काश्मीर ही खूप सुंदर जागा आहे, तिथले लोक खूप प्रेमळ आहेत. तिथल्या वातावरणात इतकी शांती जाणवते, जे मी शब्दांत सांगू शकत नाही. अशा ठिकाणी निरपराध लोकांवर असा हल्ला होणं खरंच दुर्दैवी आहे. त्या पर्यटकांचा काहीच दोष नव्हता. ज्यांनी हा हल्ला घडवून आणला, त्यांना सर्वांसमोर शिक्षा मिळाली पाहिजे. प्रत्येकाचं दु:ख त्यांना जाणवलं पाहिजे”, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.

दीपिकाने मुस्लीम अभिनेता शोएब इब्राहिमशी लग्न केलंय. इस्लाम धर्माविषयी तिने सांगितलं, “जितकं मी इस्लामला समजू शकले, त्यावरून मी हे खात्रीनं म्हणू शकते की कोणी प्रामाणिक मुस्लीम असं काम करू शकणार नाही. एखाद्या निर्दोष व्यक्तीला अशा पद्धतीने धर्माच्या नावाखाली किंवा इतर कसल्याही नावाखाली मारणं हे इस्लाम शिकवत नाही. हे इस्लामच काय, तुम्हाला कोणताच धर्म अशी शिकवण देत नाही. बायबल असो, कुराण असो, गीता असो, गुरूग्रंथसाहिब असो.. कोणत्याच धर्मग्रंथात असं लिहिलेलं नाही. एकमेकांसोबत प्रेमाने रहा, हेच प्रत्येक धर्म सांगतो. जे लोक अशा पद्धतीचे हल्ले करतात ते कोणत्याच धर्माचे नसतात. ते दहशतवादी आहेत आणि दहशतवाद्यांचा कोणताच धर्म नसतो. माणूस म्हणून ते चुकीचेच आहेत.”

दीपिका आणि शोएब हे त्यांच्या मुलासोबत काश्मीरला फिरायला गेले होते. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा ते श्रीनगरहून दिल्ली परत येत होते.