बायकोने ‘अनंत की ब्रिगेड’ वाली चोळी का घातली? निर्माता ॲटलीने दिलं हटके उत्तर
'जवान'च्या यशानंतर दिग्दर्शक ॲटलीने आपल्या लूकवरील ट्रोलिंग आणि पत्नीच्या 'Anant’s Brigade' ब्लाऊजवरील टीकेला स्पष्ट उत्तर दिले आहे. अनंत अंबानीला सर्वात जवळचा मित्र संबोधत, मुंबईतील संघर्षात त्याने दिलेल्या आधाराची ॲटलीने आठवण करून दिली.

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटामुळे ॲटली या दिग्दर्शकाचं नाव बॉलिवूडमध्येही चर्चेत आलं. आता त्याने नुकताच त्याच्या तमिळ चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा केला. यावेळी त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून ते करिअरपर्यंत अनेक विषयांवर मनमोकळेपणाने भाष्य केलं. आपल्या लूकवर होणाऱ्या ट्रोलिंगसोबतच 2024 मध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नावेळी पत्नी प्रियाने परिधान केलेल्या ‘Anant’s Brigade’ असा उल्लेख असलेल्या ब्लाऊजवर झालेल्या टीकेलाही त्याने उत्तर दिलं.
लग्नातील हे फोटो पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ॲटलीला याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्याने अनंत अंबानींना आपला सर्वात जवळचा मित्र असल्याचं सांगत, मुंबईतील संघर्षाच्या काळात अनंत यानेच आपल्याला मोठा आधार दिल्याचं स्पष्ट केलं.
माझ्या लूकबद्दल लोकांना जे बोलायचंय ते बोलू दे
एका सक्सेस मीटदरम्यान पत्रकाराने ॲटलीला विचारलं की, कोलिवूड आणि बॉलिवूडमध्ये यशस्वी चित्रपट दिल्यानंतरही त्याच्या लूकवरून किंवा अंबानींच्या लग्नातील पत्नीच्या ड्रेसवरून त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो, याबद्दल काय वाटतं? यावर ॲटली म्हणाला, “ लोकांना जे म्हणायचं आहे ते म्हणू द्या. हो, माझा रंग सावळा आहे. काही लोक मला ‘ॲव्हरेज’ म्हणतात. हे त्यांचं मत आहे आणि त्यांना ते मांडण्याचा अधिकार आहे. मला चार वेळा चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारण्याची ऑफर आली होती, पण मी त्या नाकारल्या. मी हे फक्त तुम्हाला सांगत आहे.” असं तो म्हणाला.
अनंत अंबानी माझा सर्वात जवळचा मित्र
पत्नी प्रियाच्या ‘Anant’s Brigade’ ब्लाऊजवरून झालेल्या टीकेबाबतही ॲटली स्पष्ट बोलला. “ अनंत अंबानी माझा सर्वात चांगला मित्र आहे. तो माझा सर्वात जवळचा मित्र आहे. मुंबईत जेव्हा मी कठीण काळातून जात होतो, तेव्हा त्यााने मला खूप आधार दिला. माझा हात धरला. त्यामुळे लोक काहीही म्हणोत, तो माझा मित्र आहे.” असं त्याने नमूद केलं. “ लोकांना जे बोलायचंय ते बोलू द्या. आपण आपलं काम करत राहूया आणि त्यातूनच उत्तर देऊ. माझे चित्रपट नेहमी माझं उत्तर देतात.” असंही तो म्हणाला. विशेष म्हणजे, अनंत अंबानींच्या लग्नात अनन्या पांडे, खुशी कपूर आणि शनाया कपूर यांनीही ‘Anant’s Brigade’ असा उल्लेख असलेले ब्लाऊज परिधान केले होते.
‘जवान’नंतर ॲटलीचे मोठे प्रोजेक्ट्स
2023 मध्ये प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर ‘जवान’चं दिग्दर्षन ॲटलीने केलं होतं. शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटातून ॲटलीने बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. ‘जवान’ने जगभरात ₹1,000 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. यानंतर ॲटलीने वरुण धवन अभिनीत ‘बेबी जॉन’ आणि विजय सेतुपतीच्या ‘बात्थ्चा’ या चित्रपटांची निर्मिती केली. ‘बेबी जॉन’ हा ॲटलीच्या 2016 साली प्रदर्शित झालेल्या विजय अभिनीत ‘थेरी’ या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.
अल्लू अर्जुन आणि दीपिका पादुकोणसोबत ‘राका’
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीॲटलीने कोलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून भक्कम स्थान निर्माण केलं होतं. त्याने 2011 साली ‘मुगापुथगम’मधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. मात्र, 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राजा रानी’मुळे त्याला मोठं यश मिळालं. यानंतर त्याने विजयसोबत ‘थेरी’, ‘मर्सल’ आणि ‘बिगिल’ यांसारखे गाजलेले चित्रपट दिले. ‘जवान’च्या यशानंतर ॲटली आता आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टवर काम करत आहे.
तो सध्या अल्लू अर्जुन आणि दीपिका पादुकोण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘राका’ या आगामी सायन्स-फिक्शन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.