Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी आता घराघरातील फ्रिजवर धाडी..; प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

Tukaram Mundhe: दिग्दर्शक कुणाल कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली असून नेटकऱ्यांमध्ये सध्या त्याचीच चर्चा आहे. तुकाराम मुंढेंनी आता घराघरातील किचन आणि फ्रिजची तपासणी करावी, असं त्याने म्हटलंय.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी आता घराघरातील फ्रिजवर धाडी..; प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Tukaram Mundhe
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 24, 2026 | 8:25 AM

महाराष्ट्रातील अन्नसुरक्षेच्या कारवायांमुळे सध्या चर्चेत असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे आता थेट बॉलिवूडमध्ये चर्चेत आले आहेत. ‘हम तुम’ आणि ‘फना’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक कुणाल कोहलीने तुकाराम मुंढेंना उद्देशून केलेल्या एका मजेशीर सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. कोहलीने भारतीयांच्या घरातील किचन आणि फ्रीजची तपासणी करण्याचा सल्ला मुंढेंना दिला आहे. कुणालने रविवारी 23 ऑगस्ट रोजी इन्स्टाग्राम स्टोरीवर ही पोस्ट शेअर केली. महाराष्ट्र एफडीए सध्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ठिकाणी ऑनलाइन फूड डिलिव्हरीशी संबंधित ठिकाणी अन्नसुरक्षा तपासण्या करत आहे. याच पार्श्वभूमीवर कुणालने मिश्कील अंदाजात ही मोहीम आता घराघरात राबवण्याचा सल्ला दिला आहे.

घरात करा ‘तुकाराम मुंढे क्लिनिंग’

जर तुकाराम मुंढेंनी भारतीय घरांमधील किचनच्या कपाटांपासून फ्रिजपर्यंत तपासणी केली, तर अनेक वर्षांपासून वापरत नसलेले आणि एक्सपायर झालेले खाद्यपदार्थ सापडू शकतात. विशेष म्हणजे अनेक घरांमध्ये असे पदार्थ व्यवस्थित पुसून, स्वच्छ करून पुन्हा कपाटात ठेवले जातात, मात्र त्यांचा प्रत्यक्ष वापर होत नाही, असा टोला कुणालने या पोस्टद्वारे लगावला आहे. कुणाल कोहलीने यावेळी फक्त मुंढेंना तपासणीचा सल्ला दिला नाही, तर सामान्य नागरिकांनाही स्वत:च्या घरात अशी तपासणी करण्याचं आवाहन केलं. त्याने याला मजेशीरपणे ‘तुकाराम मुंढे क्लिनिंग’ असं नाव दिलं आहे. म्हणजेच किचनच्या कपाटात किंवा फ्रिजमध्ये पडून असलेल्या जुन्या वस्तू बाहेर काढा, त्यांची एक्सपायरी डेट तपासा आणि गरज नसलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावा, असा त्यामागचा संदेश आहे.

तुकाराम मुंढे सध्या महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अन्नसुरक्षेची तपासणी आणि कारवाईचा वेग वाढला आहे. रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, रस्त्यावरील खाद्यविक्रेते तसंच ऑनलाइन माध्यमातून खाद्यपदार्थ विकणाऱ्या आस्थापनांची तपासणी केली जात आहे. नियमांचं उल्लंघन आढळल्यास सुधारणा नोटीसपासून परवाना निलंबनापर्यंत कारवाई करण्यात येत आहे. दूध भेसळ, खाद्यपदार्थांची स्वच्छता, शाळांच्या परिसरातील जंक फूड आणि प्रतिबंधित गुटखा-तंबाखूजन्य पदार्थ यांसारख्या मुद्द्यांवरही प्रशासनाकडून लक्ष दिलं जात आहे. त्यामुळे तुकाराम मुंढेंच्या कडक कार्यशैलीची चर्चा गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात होत आहे.

कुणाल कोहलीच्या या मिश्कील पोस्टमुळे अन्नसुरक्षेचा मुद्दा रेस्टॉरंटच्या किचनमधून थेट आपल्या घरच्या किचनपर्यंत पोहोचला आहे. पोस्ट विनोदी असली तरी त्यातून प्रत्येकाने आपल्या घरातील जुन्या खाद्यपदार्थांची एक्पायरी तपासण्याचा महत्त्वाचा संदेश दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us