दूरदर्शनवरील ही मालिका बघताना घाबरायचे मुलं, विदेशातही मालिकेची होती प्रचंड क्रेझ, कथा ठरलेली सुपरहिट

दूरदर्शनवरील ही मालिका बघताना मुलं प्रचंड घाबरायचे. मालिका इतकी सुपरहिट ठरली की भारतासह या मालिकेची साऊथ अफ्रीका-ब्रिटेनमध्ये होती क्रेझ. कथा ठरलेली लोकप्रिय.

दूरदर्शनवरील ही मालिका बघताना घाबरायचे मुलं, विदेशातही मालिकेची होती प्रचंड क्रेझ, कथा ठरलेली सुपरहिट
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 24, 2026 | 3:50 PM

दूरदर्शनच्या सुवर्णकाळात रामानंद सागर यांनी आपल्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप पाडली. रामायण, विक्रम आणि बेताल, लव कुश आणि श्री कृष्णा यांसारख्या मालिकांसाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत. मात्र, त्यांच्या कारकिर्दीत आणखी एक मालिका अशी होती, जिने केवळ भारतातच नाही तर परदेशातही लोकप्रियता मिळवली होती. ही मालिका म्हणजे ‘अलिफ लैला’.

1994 मध्ये आलेली अलिफ लैला ही मालिका प्रसिद्ध ‘अरेबियन नाइट्स’ अर्थात ‘हजार एक रात्री’ या कथांवर आधारित होती. मालिकेत वेगवेगळ्या रोमांचक आणि काल्पनिक कथा दाखवण्यात आल्या होत्या. अलादिन आणि जादुई दिवा, अलीबाबा आणि चाळीस चोर तसेच सिंदबादच्या सात समुद्री सफरी यांसारख्या कथा मालिकेचा भाग होत्या.

घराघरात ठरलेल्या वेळेला पाहिली जायची मालिका

त्या काळात टीव्ही मनोरंजनाचं प्रमुख माध्यम असल्याने कुटुंबातील सर्व सदस्य ठरलेल्या वेळेला टीव्हीसमोर बसून अलिफ लैला पाहत असत. विशेषतः मुस्लिम प्रेक्षकांमध्ये या मालिकेला मोठी लोकप्रियता मिळाली होती.

मालिकेतील कथा केवळ मनोरंजन करणाऱ्या नव्हत्या तर त्यातून चांगुलपणा, धैर्य, प्रामाणिकपणा आणि मानवी मूल्यांचे संदेशही दिले जात होते. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील प्रेक्षकांना या कथा भावल्या.

परदेशातही झाला मालिकेचा बोलबाला

‘अरेबियन नाइट्स’च्या कथा अनेक शतकांपासून जगभरातील वाचकांना आकर्षित करत आल्या आहेत. त्याच लोकप्रिय कथांवर आधारित अलिफ लैलाचे परदेशातही प्रसारण करण्यात आले. युनायटेड किंगडम, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका आणि इजिप्त यांसारख्या देशांमध्येही ही मालिका दाखवण्यात आली होती.

अलिफ लैलामधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या प्रसंगांपैकी एक म्हणजे जिन्नचा प्रसंग. मालिकेत जिन्नची भूमिका दयाल सिंह यांनी साकारली होती. जिन्नची दमदार देहयष्टी आणि घुमणारा आवाज यांना साउंड इफेक्ट्सची जोड देण्यात आली होती.

त्यामुळे जिन्न पडद्यावर येताच अनेक मुलांना अक्षरशः भीती वाटायची. त्या काळात आधुनिक व्हीएफएक्स किंवा ग्राफिक्स नसतानाही केवळ अभिनय, मेकअप, आवाज आणि साउंड इफेक्ट्सच्या जोरावर हा जिन्न प्रेक्षकांच्या मनात कायमचा ठसला.

अलिफ लैलाने आपल्या काल्पनिक कथा, रहस्य, जादू आणि रोमांचाच्या माध्यमातून 90 च्या दशकातील प्रेक्षकांना वेगळ्याच जगात नेलं. त्यामुळे रामानंद सागर यांच्या लोकप्रिय मालिकांच्या यादीत ‘अलिफ लैला’चं नाव आजही आवर्जून घेतलं जातं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us