जया बच्चन आणि हेमा मालिनी पापाराझींवर का संतापतात? ईशा देओलने सांगितलं कारण
पापाराझींशी वागण्याच्या पद्धतीमुळे अभिनेत्री जया बच्चन, हेमा मालिनी यांना अेकदा ट्रोल केलं जात, त्यांच्यावर टीका होते. मात्र आता या वागण्यावर ईशा देओलने त्यांना सपोर्ट केला असून त्यामागचं कारणही सांगितलं आहे.

जया बच्चन आणि हेमा मालिनी यांच्यासह अनेक ज्येष्ठ अभिनेत्री पापाराझींच्या वागणुकीमुळे यापूर्वीही चर्चेत आल्या आहेत. अनेकदा फोटो काढताना फोटोग्राफर्स त्यांना उजवीकडे-डावीकडे पाहण्यास किंवा वेगवेगळ्या पोझ देण्यास सांगतात. त्यामुळे काही वेळा या अभिनेत्री अस्वस्थ होतात. विशेषतः जया बच्चन यांना फोटोग्राफर्सशी बोलण्याच्या त्यांच्या पद्धतीवरून सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं. तर हेमा मालिनी यांनाही पापाराझींसोबतच्या वागणुकीवरून टीकेचा सामना करावा लागला आहे. आता अभिनेत्री ईशा देओलने याबाबत आपले मत मांडलं आहे. अशा प्रसंगी कलाकारांची अस्वस्थता समजून घेणं आणि त्यांच्याशी आदराने वागणं आवश्यक असल्याचे तिने म्हटलं आहे.
सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि पापाराझींच्या वागणुकीच्या मुद्द्यावर ईशा देओल हिने जया बच्चन, हेमा मालिनी यांच्यासह इतर ज्येष्ठ कलाकारांची बाजू घेतली आहे. सोशल मीडियावर अधिक लाइक्स मिळवण्यासाठी आणि लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेकदा फोटोग्राफर्सना अशा प्रकारे वागण्यास प्रोत्साहन दिलं जाते, असं इशाने म्हटलं. मात्र यासाठी केवळ फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर्सना जबाबदार धरता येणार नाही, तर सोशल मीडिया पेज चालवणाऱ्यांची भूमिकाही तपासणं गरजेचं असल्याचं इशा म्हणाली. .
इशाने दिलं लहान बाळाचं उदाहरण
वृत्तसंस्था आयएएनएसला दिलेल्या विशेष मुलाखतीत ईशाने सांगितलं की, फोटोग्राफर्सना अनेकदा त्यांच्या मागे काम करणारे लोक मार्गदर्शन करत असतात. हे समजावून सांगण्यासाठी तिने मुलाचे उदाहरण दिलं. याबाबत बोलताना ईशा म्हणाली, “ एखादं मूल मोठं होऊन किशोरवयीन होतं आणि त्याचं वागणं चांगलं नसेल, तर त्यासाठी तुम्ही कोणाला जबाबदार धराल? त्याच्या आई-वडिलांना.. कारण त्यांनी त्याला योग्य संस्कार दिले नाहीत. त्याचप्रमाणे, या प्रकरणातही फोटोग्राफर्सना कसे वागायचे, याचे मार्गदर्शन केले जात असावे, असे मला वाटते.” असं ईशा म्हणाली.
“ केवळ फोटो काढणाऱ्या व्यक्तीचीच चूक आहे, असं मला वाटत नाही. खरी जबाबदारी त्या लोकांची आहे, जे सोशल मीडिया पेज चालवतात आणि अधिक लाइक्स मिळवण्यासाठी किंवा लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अशा गोष्टी पोस्ट करू इच्छितात. त्यामुळे या समस्येच्या मुळाशी जाऊन विचार करण्याची गरज आहे” असं ईशाने सांगितलं.
ज्येष्ठ कलाकारांचा आदर राखला पाहिजे
चित्रपटसृष्टीत ज्येष्ठ कलाकारांचे योगदान खूप मोठं आहे आणि त्यांचा आदर राखला पाहिजे, असंही ईशा देओलने पुढे सांगितलं. कोणत्या कलाकारांना त्यांच्यासोबत हसत-खेळत संवाद साधायला आवडतो आणि कोणाला अशा प्रकारच्या वागणुकीमुळे अस्वस्थ वाटतं, हे फोटोग्राफर्सनी हे समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक कलाकाराची आवड आणि वैयक्तिक मर्यादा लक्षात घेऊन त्यांच्याशी आदराने वागणे आवश्यक आहे, असे मत ईशाने व्यक्त केले.