आई होऊ शकत नसल्याने दिलीप कुमार आणि मधुबालाचं ब्रेकअप, ‘त्या’ दाव्यावर अभिनेत्रीच्या बहिणीचं सडेतोड उत्तर, म्हणाली, दोन प्रेमींना…
Dilip Kumar And Madhubala Breakup : प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांनी एका मुलाखतीत दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या ब्रेकअपबद्दल दावा केलेला. यावर आता मधुबाला यांच्या बहिणीनं प्रतिक्रिया दिली आहे.

मधुबाला आणि दिलीप कुमार यांची प्रेमकथा ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध प्रेमकथांपैकी एक आहे. काळाच्या ओघात, त्यांच्या नात्याबद्दल आणि त्यांच्या विभक्त होण्याच्या कारणांबद्दल अनेक चर्चा झाल्या. असाच एक दावा ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी केला होता. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, जेव्हा दिलीप कुमार यांना मधुबाला यांच्या हृदयाच्या आजाराबद्दल आणि त्यांना मूल होऊ शकत नसल्याबद्दल कळलं, तेव्हा ते दोघं विभक्त झाले. पण, मधुबाला यांची बहीण मधुर भूषण यांनी आता हा दावा खोटा असल्याचं फेटाळून लावलं आहे.
काय म्हणाली मधुबाला यांची बहीण?
विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत मधुर यांनी सांगितलं की, ही एक खूप मोठी कहाणी आहे. मधुबाला यांना खूप उशिरा हृदयरोगाचं निदान झालं होतं. त्यांना खूप नंतर हृदयाचा त्रास सुरू झाला. त्यावेळी दिलीप कुमार यांचा याच्याशी काहीही संबंध नव्हता. मुमताज यांच्या दाव्यावर उत्तर देताना मधुर म्हणाल्या की, ‘हे विधान पूर्णपणे खोटं आहे. मुंबईच्या जुहू मुस्लिम स्मशानभूमीत त्या दोन प्रेमींना एकमेकांपासून फक्त ५ ते १० मीटर अंतरावर दफन करण्यात आलं आहे. त्यांना एकमेकांच्या अगदी जवळ दफन केलं आहे.
१९५७ मध्ये ‘मुघल-ए-आझम’च्या शूटिंगदरम्यान मधुबाला आणि दिलीप कुमार यांचा ब्रेकअप झाला. मधुर म्हणाल्या की, ‘जेव्हा ते लंडनला पोहोचले, तेव्हा डॉक्टरनं मधुबाला यांना भेटल्यानंतर १५ मिनिटांतच सांगितलं की, तिच्या हृदयात छिद्र आहे आणि ती फक्त आणखी दोन वर्षे जगू शकेल. त्यावर कोणताही इलाज नव्हता आणि कोणताही डॉक्टर धोका पत्करायला तयार नव्हता. कुटुंबाने अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि ते सर्व त्याच निष्कर्षावर आले.’
मधुबाला यांनी ऐकण्यास नकार दिला. त्या म्हणाल्या, ‘सगळे मूर्खपणाचं बोलत आहेत. माझ्या हृदयात छिद्र नाही. मी धावू शकते, मी नाचू शकते.’ मात्र, ‘मुघल-ए-आझम’मधील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान, ज्यात त्यांना साखळ्यांनी बांधलं होतं, तेव्हा मधुबाला बेशुद्ध झाल्या. या घटनेनंतर मधुबाला यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यांचं वजन खूप कमी झालं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि नंतर मधुबाला यांचा मृत्यू झाला. वयाच्या तिशीपूर्वीच मधुबाला अंथरुणाला खिळल्या आणि वयाच्या ३६ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
मधुर म्हणाल्या की, ‘माझ्या बहिणींनी पारशी आणि पंजाबी पुरुषांशी लग्न केलं. आमच्या एका बहिणीनं जॉनी वॉकरच्या भावाशी लग्न केलं. त्यामुळे, किशोर आणि मधुबालाच्या प्रेमकथेला माझ्या वडिलांचा कोणताही आक्षेप नव्हता.’ किशोर कुमार यांच्याशी लग्न करूनही मधुबाला दिलीप कुमारला कधीच पूर्णपणे विसरल्या नाहीत, असा दावा मधुर यांनी केला.
