विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली, शेवटी पाठीत खंजीर खुपसला..; ईशा सिंहची संतप्त पोस्ट, ब्रेकअप कन्फर्म
अभिनेत्री ईशा सिंह आणि अविनाश मिश्रा यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. अशातच ईशाने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने नव्या चर्चांना तोंड फोडलं आहे. खासगी आयुष्याची खिल्ली उडवणाऱ्यांना तिने या पोस्टमधून थेट इशारा दिला आहे.

Avinash Mishra-Eisha Singh: टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ईशा सिंह सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेता अविनाश मिश्रा आणि ईशा सिंह यांच्या अफेअरच्या चर्चा यापूर्वी अनेकदा रंगल्या होत्या. मात्र, आता दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या आणि त्यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा मनोरंजन विश्वात सुरू आहेत. या चर्चांदरम्यान ईशाने सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट सध्या लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये तिने खासगी आयुष्य, नात्यांमधील विश्वास आणि शांत राहण्यामागची भूमिका याबद्दल परखड शब्दांत आपलं मत मांडलं आहे. ईशाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, तिचं शांत राहणं आणि स्वतःच्या मानसिक शांततेचं रक्षण करणं याचा अर्थ तिला गरज पडल्यास स्वतःची बाजू मांडता येत नाही, असा अजिबात नाही.
पुढे तिने खासगी नात्यांचा सार्वजनिक मनोरंजनासाठी वापर करणाऱ्यांनाही सुनावलं आहे. नाती ही वैयक्तिक असतात आणि त्यांना सार्वजनिक मनोरंजनाचा विषय बनवू नये, असं सांगणारी व्यक्तीच दुसरीकडे त्याच गोष्टींची खिल्ली उडवत असेल, तर हा दुटप्पीपणा असल्याचं ईशाने म्हटलं आहे. एका बाजूला खासगीपणाचा पुरस्कार करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या अगदी विरुद्ध वागायचं, हे योग्य नसल्याचं तिने स्पष्ट केलं.
ईशा सिंहची पोस्ट-
इतकंच नाही, तर आपल्याला अशा परिस्थितीत ढकलू नका, जिथे प्रत्येक गोष्टीचा पुरावा योग्य नावांसह सार्वजनिक करावा लागेल, असा इशाराही तिने दिला आहे. त्याचे परिणाम काहीही असले तरी सर्व पुरावे समोर आणण्याची वेळ माझ्यावर आणू नका, अशा आशयाचं विधान तिने केलं आहे. त्यामुळे ईशाच्या या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या पोस्टमधील आणखी एका विधानाने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. आयुष्यात अशा व्यक्तीवर विश्वास ठेवण्याची चूक आपण केली, ज्याने शेवटी पाठीत खंजीर खुपसला, असं ईशाने म्हटलं आहे. काही लोकांसाठी आयुष्यातील एखाद्या नात्यातून बाहेर पडणं आणि पुढे जाणं खूप सोपं असतं. त्यामुळे आता आपणही पुढे जाण्याचा प्रयत्न करू, असं तिने पोस्टच्या शेवटी लिहिलं आहे.
ईशाच्या या शब्दांमुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यात नेमकं काय घडलं आहे, याबद्दल चाहत्यांमध्ये विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. तिची ही पोस्ट अविनाश मिश्रासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांशी जोडली जात आहे. मात्र, ईशाने या पोस्टमध्ये कुठेही अविनाशचं नाव घेतलेलं नाही किंवा ब्रेकअपबाबत थेट स्पष्टीकरण दिलेलं नाही. याआधी अविनाशनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित नेटकऱ्यांना खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती केली होती.
अविनाश मिश्रा आणि ईशा सिंह यांची पहिली भेट सलमान खान होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस 18’ या रिअॅलिटी शोमध्ये झाली होती. ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू झालेल्या या शोमध्ये दोघांची मैत्री झाली. त्यांच्यातील जवळीक आणि एकमेकांसोबतची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. शो संपल्यानंतरही दोघं अनेकदा एकत्र दिसले. त्यांनी ‘काला छा काला’, ‘आओ ना’ आणि ‘हीरिये’ यांसारख्या म्युझिक व्हिडीओंमध्येही एकत्र काम केलं. त्यामुळे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू होत्या.