Welcome 3 | आधी अफेअर मग मोडला साखरपुडा; आता 20 वर्षांनंतर एकत्र काम करणार अक्षय कुमार – रवीना टंडन

अक्षय आणि रवीनाने 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 1995 पासून दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. त्या काळात या दोघांची जोडी सर्वाधिक चर्चेत होती.

Welcome 3 | आधी अफेअर मग मोडला साखरपुडा; आता 20 वर्षांनंतर एकत्र काम करणार अक्षय कुमार - रवीना टंडन
Raveena Tandon and Akshay Kumar
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 24, 2023 | 11:44 AM

मुंबई | 24 ऑगस्ट 2023 : 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या होत्या, ज्या चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या नात्याची जोरदार चर्चा झाली. त्यापैकी काही जोड्यांनी लग्नापर्यंतचा प्रवास केला, तर काहींचं नातं संपुष्टात आलं. नंतर बरीच वर्षे हे कलाकार एकमेकांसमोरही आले नाहीत. तर बऱ्याच वर्षांनंतर एकत्र स्क्रीन शेअर करत काहींनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. अशीच एक जोडी अभिनेता अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची आहे. एकेकाळी बॉलिवूडमध्ये या दोघांच्या रिलेशनशिपची जोरदार चर्चा होती. मात्र नातं तुटल्यानंतर हे दोघं कधी एकत्र दिसलेच नाहीत. आता तब्बल 20 वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार असल्याचं कळतंय. आगामी ‘वेलकम 3’ या चित्रपटात दोघं एकत्र काम करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

वेलकम हा कॉमेडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. त्याचा तिसरा भाग ‘वेलकम टू जंगल’ या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फिरोज नाडियादवाला या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. 2024 या वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. यामध्ये अक्षय कुमारसोबतच संजय दत्त आणि परेश रावल यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागात अक्षयने परेश रावल यांच्यासोबत काम केलं होतं. तर दुसऱ्या भागात अक्षयची जागा जॉन इब्राहिमने घेतली होती. मात्र ‘वेलकम बॅक’ हा सीक्वेल फारसा यशस्वी ठरला नव्हता. आता तिसऱ्या भागात मोठमोठ्या कलाकारांची वर्णी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अक्षय आणि रवीनाने 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 1995 पासून दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. त्या काळात या दोघांची जोडी सर्वाधिक चर्चेत होती. त्यांच्या अफेअरचे किस्से आजही चवीने चघळले जातात. 90 च्या दशकात या दोघांचा साखरपुडाही झाल्याच्या चर्चा होत्या. मात्र काही कारणास्तव त्यांचं लग्न मोडलं. नंतर अक्षयने 2001 मध्ये ट्विंकल खन्नाशी लग्न केलं. तर रवीनाने 2004 मध्ये अनिल थडानीशी लग्नगाठ बांधली.