‘हे आज जात, धर्म शिकवायला आलेत’; ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांना ‘शालू’चे शालजोडे

अभिनेत्री राजेश्वरी खरातने धर्मांतर केल्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. अशा टीकाकारांना आता तिने सडेतोड उत्तर दिलं आहे. यावेळी तिने निवडणूक आणि मतदानाचंही उदाहरण दिलं आहे.

हे आज जात, धर्म शिकवायला आलेत; ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांना शालूचे शालजोडे
Rajeshwari Kharat
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 22, 2025 | 9:01 AM

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ या चित्रपटात शालूची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री राजेश्वीर खरात सध्या तिच्या धर्मांतरामुळे चर्चेत आली आहे. राजेश्वरीने ‘ईस्टर संडे’नंतर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आणि फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची माहिती दिली. या फोटोंमध्ये राजेश्वरीसोबतच तिच्या कुटुंबीयांनी पांढरे कपडे परिधान केल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे त्यांनीसुद्धा धर्मांतर केल्याचं स्पष्ट झालं. राजेश्वरीने हे फोटो पोस्ट करताच नेटकऱ्यांनी त्यावरून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. या ट्रोलिंगवर आता राजेश्वरीने रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

राजेश्वरी खरातची पोस्ट-

‘निवडणुका- प्रत्येकी 500 रुपये, किराणा भरून पिशव्या, दारू व हॉटेलला जेवण आणि साहेब, दैवत, देवमाणूस.. हे आज जात/ धर्म शिकवायला आले आहेत, तुमचं स्वागत आहे. कोणी पैशांसाठी किंवा अन्नासाठी दुसरा धर्म स्वीकारतात तर कोणी मतदान करतात. माझ्या मते एकतर दोघं बरोबर किंवा दोघंही चुकीचे,’ असं तिने लिहिलंय. त्याचसोबतच या पोस्टच्या अखेरीस तिने एक टीपसुद्धा लिहिली आहे. ‘टीप: माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातील आहे आणि मी सर्व धर्मांचा आदर करते. बाकी वरील पोस्ट मनोरंजक हेतूने स्विकारली जावी एवढी विनंती’, असं तिने म्हटलंय.

Rajeshwari Kharat

धर्मांतराच्या फोटोंवर येणाऱ्या नकारात्मक कमेंट्सनंतर राजेश्वरीने तिचे ते फोटो इन्स्टाग्रामवरून काढून टाकले आहेत. ‘कारण तुमच्यासाठी माझ्या योजना मला माहीत आहेत, असं परमेश्वर म्हणतो,’ असं कॅप्शन देत तिने धर्मांतर केल्याचे फोटो पोस्ट केले होते. त्यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. पैशांसाठी धर्मांतर केलंस का, असा सवालही काहींनी राजेश्वरीला विचारला. अशा टीकाकारांना राजेश्वरीने निवडणुका आणि मतदान यांचं उदाहरण देत उत्तर दिलं आहे. काही वेळानंतर राजेश्वरीने तिच्या उत्तराचीही पोस्ट इन्स्टाग्रामवरून काढून टाकली आहे.

2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फँड्री’नंतर राजेश्वरीने ‘पुणे टू गोवा’ आणि ‘आयटमगिरी’ या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. राजेश्वरी मूळची पुण्याची आहे. 8 एप्रिल 1998 रोजी तिचा जन्म झाला. चित्रपटांशिवाय ती अनेक म्युझिक व्हिडीओंमध्येही झळकली आहे. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मन उनाड’ या सुपरहिट म्युझिकमध्ये ती दिसली होती.