खऱ्या शाहरूखपेक्षा डुप्लिकेट शाहरूखचा थाट पाहाच; चाहत्यांची तुफान गर्दी,बॉडीगार्डही हैराण
शाहरुख खानचे चाहते किती आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाही. पण शाहरूखच्या डुप्लिकेटचे देखील तेवढेच चाहते असणे हे मात्र नक्कीच आश्चर्य वाटणारं आहे. होय शाहरूख खानच्या डुप्लिकेटला पाहण्यासाठी चाहत्यांनी तोबा गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. कोण आहे हा डुप्लिकेट शाहरूख?

बॉलिवूडमधील आपला आवडता सेलिब्रिटी दिसला किंवा तो कोणत्या ठिकाणी पोहोचणार आहे याची माहिती जेव्हा चाहत्यांना समजते तेव्हा ते आपल्या आवडत्या सेलिब्रिटीची एक झलक पाहण्यासाठी तोबा गर्दी करतात. त्यात असेही काही कलाकार आहेत ज्यांना पाहण्यासाठी तर चाहते अगदी काहीही करू शकतात. जसं की अमिताभ बच्चन, सलमान खान आणि यातील अजून एक नाव म्हणजे बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान.
हुबेहूब शाहरूख
जर शाहरुख खान कोणत्याही ठिकाणी येणार असेल तर त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमते. चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. पण शाहरुखचे चाहते फक्त त्याला पाहायला येत नाहीत तर त्याच्यासारखं दिसण्याचा प्रयत्नही करतात. असाच एक शाहरूखचा चाहता आहे. जो हुबेहूब त्याच्यासारखाच दिसतो. त्याने अगदी त्याच्यासारखाच लूक केलेला आहे. तेच मोठे केस आणि चष्मा. जे पाहून कोणीही फसेल. निळ्या रंगाचा जॅकेट, पांढरा टी-शर्ट आणि गडद रंगाच्या जीन्समधील हा माणूस खरोखर शाहरुख खानसारखा दिसतो.
डुप्लिकेट शाहरुख खानला पाहण्यासाठी चाहत्यांची तोबा गर्दी
आश्चर्याची गोष्ट म्हणजे शाहरुख खानला पाहण्यासाठी जेवढी गर्दी जमते तेवढीच गर्दी या डुप्लिकेट शाहरूखला पाहण्यासाठी जमली आहे. त्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये चाहते या डुप्लिकेट शाहरुख खानला पाहण्यासाठी वेडे झालेले दिसत आहेत. त्याच्या बॉडीगार्डसनाही त्या गर्दीला रोखने कठीण झाले होते.
चाहत्यांची चक्क धक्काबुक्की अन्…
या डुप्लिकेट शाहरूखचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. जे सिने हब नावाच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये लोकांची तोबा गर्दी दिसत आहे. तर त्याचे अंगरक्षक गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ही गर्दी नियंत्रणा बाहेर जात असल्याचं दिसत आहे. एवढंच नाही तर, बरेच लोक त्याला पाहण्यासाठी गाडीवर चढत आहेत,तसेच चाहत्यांमध्ये चक्क धक्काबुक्कीही दिसत आहे. प्रत्येकजण या डुप्लिकेट शाहरुख खानची झलक पाहण्याचा प्रयत्न करत आहे.
हा डुप्लिकेट शाहरुख खान कोण आहे?
या डुप्लिकेट शाहरुख खानचे नाव इब्राहिम कादरी आहे. ज्याने डुप्लिकेट शाहरुख खान म्हणून खूप प्रसिद्धी मिळवली आहे. इब्राहिम कादरी सोशल मीडियावर डुप्लिकेट शाहरुख म्हणून प्रसिद्ध आहे. याशिवाय तो शाहरुख खान म्हणून कार्यक्रमांमध्येही सहभाग घेत असतो.या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भरभरून कमेंट्स येत आहेत.