मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारणारा अभिनेता, निर्णय पाहून सर्वच थक्क, राजकारणात येण्यासाठी आलेल्या ऑफर
या चित्रपटात एकाच दिवसात मुख्यमंत्र्यांनी घेतलेले सर्वात जास्त निर्णय. अभिनय पाहून चित्रपटातील अभिनेत्याला येऊ लागल्या होत्या राजकारणात येण्याच्या ऑफर. आजही त्या भूमिकेचं सर्वजण करतात कौतुक.

अभिनेता अनिल कपूरच्या गाजलेल्या ‘नायक : द रिअल हिरो’ या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास निमित्ताने अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर चित्रपटातील काही दमदार प्रसंगांचा व्हिडीओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील ‘शिवाजी राव’ ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
अनिल कपूरने सांगितले की, त्याला या भूमिकेने केवळ एका सामान्य माणसाचा मुख्यमंत्री होण्याचा प्रवास म्हणून आकर्षित केले नव्हते. तर सत्ता हातात आल्यानंतर जनतेच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी शिवाजी राव आपल्या अधिकारांचा कसा वापर करतो ही गोष्ट त्याला अधिक भावली. अशा उद्देशपूर्ण व्यक्तिरेखेची भूमिका साकारण्याचे भाग्य मिळणे हा आपल्यासाठी मोठा सन्मान असल्याचे त्याने म्हटले.
एक दिवसाचा मुख्यमंत्री
एस. शंकर दिग्दर्शित ‘नायक’ हा त्याच्या ‘मुधलवन’ या गाजलेल्या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. चित्रपटात अनिल कपूरने एका टीव्ही पत्रकाराची भूमिका साकारली होती. मुख्यमंत्री बलराज चौहान यांची मुलाखत घेताना शिवाजी राव भ्रष्टाचार आणि प्रशासनातील त्रुटींवर थेट प्रश्न उपस्थित करतो. त्यानंतर त्याला एक दिवसासाठी मुख्यमंत्री बनण्याचे आव्हान दिले जाते आणि तो हे आव्हान स्वीकारून अनेक धाडसी निर्णय घेतो.
चित्रपटात अनिल कपूरसोबत राणी मुखर्जी, दिवंगत अमरीश पुरी, परेश रावल, जॉनी लीव्हर आणि सौरभ शुक्ला यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. ‘रुखी सूखी रोटी’ आणि ‘नायक’चे टायटल ट्रॅक यांसारखी गाणीही लोकप्रिय झाली.
अनिल कपूर नाही तर हा अभिनेता होता नायकसाठी पहिली पसंत
विशेष म्हणजे, शिवाजी रावच्या भूमिकेसाठी अनिल कपूर हे पहिली पसंती नव्हते असेही सांगितले जाते. दिग्दर्शक एस. शंकर यांनी याआधी आमिर खान आणि शाहरुख खान यांच्याशी या भूमिकेसाठी संपर्क साधला होता. मात्र अखेर ही भूमिका अनिल कपूर यांच्या वाट्याला आली आणि त्यांनी आपल्या अभिनयाने ती अजरामर केली.
‘नायक’नंतर अनिल कपूरला राजकारणात येण्याच्या ऑफर्सही मिळाल्या होत्या. मात्र राजकारणात पूर्ण क्षमतेने आणि शंभर टक्के बांधिलकीने काम करता येणार नाही असे वाटल्याने त्याने त्या ऑफर्स नाकारल्याचे त्याने यापूर्वी सांगितले होते.
25 years of Nayak.
What drew me to Shivaji Rao was never just the journey from a common man to the Chief Minister. It was what he chose to do once he got there, to use the power he had to make a difference to the people.
To portray a role with that kind of purpose was a… pic.twitter.com/0kXVFbP9Qr
— Anil Kapoor (@AnilKapoor) September 7, 2026
सामान्य माणसालाही व्यवस्था बदलण्याची ताकद मिळू शकते, हा ‘नायक’चा मध्यवर्ती विचार आजही तितकाच प्रभावी वाटतो. त्यामुळेच 25 वर्षांनंतरही हा चित्रपट आणि शिवाजी रावची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या स्मरणात कायम आहे.