ज्येष्ठ निर्माते, सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

ज्येष्ठ चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे.

ज्येष्ठ निर्माते, सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा
Pahlaj Nihalani
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 04, 2026 | 12:04 PM

सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांचं निधन झालं. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहलाज यांचे कौटुंबिक मित्र शशी रंजन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. नुकतंच त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आलं होतं. पहलाज यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. ते ‘असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्रॅम प्रोड्युसर्स’चे 29 वर्षांपर्यंत अध्यक्ष होते. 2009 मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. तर 2017 मध्ये त्यांना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आलं होतं. पहलाज निहलानी हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जायचे. त्यांनी 1982 मध्ये ‘हथकडी” या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली होती. पहलाज यांच्या चित्रपटातून गोविंदा आणि चंकी पांडे यांसारख्या अभिनेत्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

पहलाज निहलानी यांनी ‘गुनाहों का फैसला’, ‘पाप की दुनिया’, ‘मिट्टी और सोना’, ‘शोला और शबनम’ आणि ‘आंखे’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. यापैकी ‘आंखे’ हा 1990 च्या दशकातील सर्वांत मोठ्या बॉलिवूड ब्लॉकबस्टर्सपैकी एक ठरला होता. चित्रपट निर्मितीसोबतच निहलानी यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवलं होतं. 2012 मध्ये त्यांनी ‘अवतार’चं दिग्दर्शन केलं होतं. तसंच 2008 च्या ‘हल्लाबोल’ या चित्रपटात त्यांनी एक छोटी भूमिकाही साकारली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ हे प्रचारगीत तयार केल्यामुळे निहलानी चर्चेत आले होते.

पहलाज निहलानी यांनी 2015 मध्ये सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्या नियुक्तीनंतर लगेचच त्यांनी अत्यंत कठोर मार्गदर्शक तत्त्वांचा एक नवीन संच जारी केला होता. 2015 ते 2017 या काळात त्यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. सेन्सॉरशिप आणि चित्रपट प्रमाणपत्रावरून झालेल्या वादविवादांमुळे त्यांचा कार्यकाळ अनेकदा चर्चेत राहिला होता. त्यांच्या कार्यकाळात सेन्सॉर बोर्डाने घेतलेल्या अनेक निर्णयांनी चित्रपटसृष्टीत चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे पहलाज निहलानी हे सर्वाधिक चर्चेत असलेल्या सीबीएफसी प्रमुखांपैकी एक बनले होते.

Follow Us