त्या फ्लॅटमध्ये काही तरी घडतंय… भूताची भिती आणि… 25 वर्षापासून रिकामा फ्लॅट; दिग्दर्शकाने जे सांगितलं…

राम गोपाल वर्मा याचं दिग्दर्शन आणि उर्मिला मातोंडकरचा अप्रतिम अभिनय याने सजलेला 'भूत' हा चित्रपट आजही रसिकांच्या लक्षात आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेलं घर अजूनही रिकामं आहे, त्याबद्दल दिग्दर्शकाने मोठा खुलासा केलाय.

त्या फ्लॅटमध्ये काही तरी घडतंय... भूताची भिती आणि... 25 वर्षापासून रिकामा फ्लॅट; दिग्दर्शकाने जे सांगितलं...
बॉलिवूडचा सर्वाच हॉरर चित्रपट
Image Credit source: social media
| Updated on: Mar 16, 2026 | 1:22 PM

राम गोपाल वर्मा… बॉलिवूडमधील एक उत्तम दिग्दर्शक, आजकाल ते फार कार्यरत नसले तरी एकेकाळी त्यांच्या चित्रपटांनी लोकांना वेड लावलं होतं वेड.  रंगीला, सरकार, कंपनी किंवा  भूत.. एकाहून एक सरस चित्रपट देणारे दिग्दर्शक अशी त्यांची ओळख.  साधारण 2 दशकांपूर्वी म्हणजे 2003 साली आलेला त्यांचा ‘भूत’ हा भयपट म्हणजे सर्वोत्तम चित्रपट होता. अनेक रसिक, सिनेप्रेमी दर्दींच्या मनावर हा चित्रपट कोरला गेलाय.

अजय देवगण , उर्मिला मातोंडकर, नाना पाटेकर , रेखा, फरदीन खान यांची भूमिका असलेल्या या चित्रपटाची आजही चर्चा होते. सर्वांत स्मरणीय अशा भयपटांपैकी एक असलेला हा चित्रपट आहे. रेड लॉफ्ट फिल्म फेस्टिव्हल 2026 मध्ये हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पुन्हा दाखवण्यात आला. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी चाहत्यांशी संवाद साधला आणि काही मनोरंजक गोष्टी आणि अनेक किस्से शेअर केले.

‘भूत’चा तो फ्लॅट अजूनही रिकामाच

या दरम्यान राम गोपाल वर्मा म्हणाले, “मी हा चित्रपट फक्त 30 दिवसांत पूर्ण केला, कारण मी त्याचा बहुतांश भाग एकाच अपार्टमेंटमध्ये चित्रित केला होता. पण त्याबद्दलच एक मनोरंजक गोष्ट सांगायची इच्छा आहे. 2002 साली आम्ही या चित्रपटाचं शूटिंग केलं ना, त्याला आता 20 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटलाय. पण आजही तो फ्लॅट रिकामाच आहे. चित्रपट रिलीज झाल्यावर तो फ्लॅट खूप चर्चेत आला, प्रसिद्ध झाला, आणि तेव्हापासूनच कोणीही त्या फ्लॅटमध्ये रहायला धजावायचं नाही. हे घर लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये होतं,” असं राम गोपाल वर्मा यांनी सांगितलं.

मला सगळ्यांची भीती वाटत होती..

यावेळी राम गोपाल वर्मा यांनी खुलासा केला की ते लहनपणापासूनच “द एक्सॉर्सिस्ट” चे चाहते आहेत. या चित्रपटाचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला. तो पाहिल्यानंतर मला नीट झोप येत नव्हती. महिनाभर मला काहीही जाणवत नव्हते. मला सगळ्यांची भीती वाटत होती, अगदी माझ्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांचीही!” असा किस्साही त्यांनी सांगितलं.

भूत बनवण्या मागचं कारण

2003 साली आलेल्या त्यांच्या ‘भूत’ चित्रपटाबद्दल बोलताना राम गोपाल वर्मा पुढे म्हणाले की, “जेव्हा मी ‘भूत’ बनवत होतो, तेव्हा सुरुवातीला तो एका हवेलीत सेट करण्याचा विचार होता, पण ती सर्वात क्लिष्ट कल्पना वाटली. एका न सांगितलं की हवेलीची कल्पना खूप जुनी आहे आणि हॉरर चित्रपटामध्ये ते खूप कॉमन असतं. आपण तो गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर सेट करूया का? असं तो म्हणाला. तेव्हा मी विचार केली यासाठी एखाद्या खास जागीच का जायचं ? लोखंडवालामध्येच त्याचा सेट लावूया. आपल्या घरातंही असं घडू शकतं, असं जेव्हा थिएटरमध्ये आलेल्या लोकांना वाटतं, तेव्हाच हॉरर चित्रपट सर्वात प्रभावी ठरतो, असं मला वाटतं. ते जितके ओळखीचं वाटेल तितकंच ते जास्त खरं वाटेल. असं राम गोपाल वर्मा म्हणाले.

Follow Us